मालेगावी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाकाळात सर्वच जण आपल्या परीने योगदान देत असतानाच पोलीस बंदोबस्तात दिवस-रात्र एक करत पहारा देणाऱ्या गृहरक्षक दलाचेही जवान आहेत. मात्र, या जवानांची उपेक्षा होत आहे. याबाबत गृहरक्षक दलाचे जवान आनंद चव्हाण यांनी सांगितले, ५० वर्षे वयावरील होमगार्ड यांना कोरोनाकाळापासून एकदाही बंदोबस्ताची ड्यूटी देण्यात आलेली नाही. ज्यांची नेमणूक करण्यात आली त्यांना दीड वर्षापासून मानधन मिळालेले नाही. त्यातही ५० वर्षांवरील १०० होमगार्ड आणि ८० महिला होमगार्ड यांना काम देण्यात आले नसल्याने या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पर्यायाने उदरनिर्वाह कसा करावा आणि कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मिळेल ते काम करत कुटुंब खर्च चालवला जात आहे. शासनाने त्यांना कुठलीही आर्थिक मदत केलेली नाही. कोरोनाकाळात काही होमगार्ड्सना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. होमगार्डला आपल्या अडचणी सोडविण्यासाठी थेट नाशिकला जावे लागते. पूर्वी तालुकास्तरावर तालुका समादेशक व अंशकालीन लिपिक यांच्यामार्फत अडचणी साेडविल्या जात होत्या. परंतु महासमादेशक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व तालुका समादेशक पद व अंशकालीन लिपिक सर्व अधिकारी पद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर खूप अडचणी निर्माण होत आहेत.
कोट....
मालेगाव पथकात अंदाजे ५५० पुरुष व ८० महिला होमगार्ड असून, त्यापैकी २१९ पुरुष बंदोबस्तकामी हजर आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व होमगार्ड्सना इतर राज्यांप्रमाणे ३६५ दिवस काम मिळाले पाहिजे. त्यांना पोलिसांप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. होमगार्ड संघटना ही १९४७ पासून स्थापन करण्यात आली असूनसुद्धा या संघटनेला शासकीय दर्जा मिळालेला नाही.
- भरत चव्हाण, होमगार्ड