श्याम बागुलविधानसभा निवडणुकीचे चित्र नामांकन दाखल करण्यापूर्वीच बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजप, सेनेत ज्या पद्धतीने इनकमिंग दररोज सुरू होते त्यावरून मतदार पुन्हा राज्यात युतीच्या उमेदवारांनाच कौल देणार व विरोधकांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारदेखील मिळणार नाहीत अशा प्रकारे वातावरण निर्मिती पद्धतशीरपणे तयार करण्यात आले होते. या वातावरण निर्मितीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर असले तरी, त्यांना विरोधकांकडून हातभार लावला जात होता हेदेखील तितकेच खरे होते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक एकतर्फी होते की काय असा प्रश्न मतदारांना पडत होता. आयारामांच्या संख्येने सत्ताधारी पक्षाला आलेली सूज पाहता अशा सर्वांची निवडणुकीत वर्णी लावण्याची मोठी कसरत दोन्ही पक्षांना करावी लागणार असे दिसत होते व त्यासाठी प्रसंगी युती तुटून दोन्ही पक्ष आमने-सामने लढतील व त्याचा फायदा विरोधकांना होईल, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तसे काही झाले नाही. सत्तेची चटक लागलेल्या दोन्ही पक्षांनी यंदा समजदारीची भूमिका घेत प्रसंगी आपल्या भावनांना मुरड घालत युती करण्याचा निर्णय घेतला व उमेदवारही जाहीर करून टाकले आहेत. त्यामुळे युती होणार का, नाही झाली तर काय चित्र असेल, कोणता पक्ष फुटेल अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे मिळून गेली आहेत. युतीचे उमेदवार गुरुवारी, शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर झाल्याने आता ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नाराजांचा मोठा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर उभा ठाकला आहे. नाशिक जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास उमेदवारांनी विरोधकांशी लढावे की स्वकीयांची बंडखोरी व नाराजीचा सामना करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या भाजपाने त्यातील फक्त पाच जणांना उमेदवारी देऊन १७० इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातील एखाद-दुसरा वगळता अन्य तुल्यबळ इच्छुक होते. त्यांचे आजवरचे पक्षातील योगदान, जनमाणसातील प्रतिमा पाहता, ते खरोखर विधानसभेचे उमेदवार होऊ शकत होते. परंतु पक्षाने या सा-या गोष्टींचा फार खोलवर विचार न करता, पाच जागांवर पाच उमेदवार जाहीर करून अन्य इच्छुकांना पुन्हा पक्षाच्या सतरंज्या उचलणे व झेंडा लावण्याचे काम सोपविल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. अशा इच्छुकांनी आता बंडखोरीची भाषा सुरू केली आहे तर काहींनी तिकीट वाटपावर उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. असाच प्रकार शिवसेनेतही सुरू झाला आहे. आजवर पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना अचानक पक्षाने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात असून, त्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरी व नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या नाराजांची रसद निवडणुकीत कोणाला पोषक ठरणार त्याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यात प्रामुख्याने सामाजिक, राजकीय व जातीय समीकरणांचा आधार घेतला जात आहे. पक्षाने अन्याय केल्याची ठायीठायी भावना निर्माण झालेल्या या नाराज व बंडखोरांची पक्षाकडून दखल घेतली जाऊन कदाचित त्यांची नाराजी काढण्याचा व मन वळविण्याचा प्रयत्नही केला जाईल. परंतु ‘बुंद से गई वो हौद से नही’ ज्यांनी निवडणूक तयारी करून समर्थक, हितचिंतकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्यांना आता सतरंज्या उचलण्याचेच काम पक्षाने ठेवल्याचे पाहून ते कितपत निवडणुकीत सक्रिय होतील, याविषयी साशंकता आहे. त्यामुळे बंडखोर, नाराजांचा फटका साहजिकच त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे, त्याचा लाभ उठविण्याचा पुरेपूर फायदा विरोधकांनी उचलला नव्हे तर नवलच !