एखादे काम लवकर मार्गी लागावे यासाठी काही जण पैशांचे प्रलोभन दाखवितात, तर काही तत्काळ काम करुन देण्यासाठी उघडपणे देवाण-घेवाणीची भाषा करतात. यात कोणी पैसे द्यायला आढेवेढे घेतले तर त्याला नियमांची भाषा ऐकवून वारंवार हेलपाटे मारण्यास प्रवृत्त केले जाते. जे यात मुरलेले असतात, ते सरळ देवघेव करून कामे करुन घेतात. परंतु ज्यांना लाच द्यायची नसते, ते लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुन संबंधिताला अद्दल घडवित असतात. अपवाद वगळता सर्वच क्षेत्रात लाचखोर सापळ्यात अडकत आहेत, तरीदेखील रंगेहाथ पकडण्याचे प्रकार काही केल्या थांबत नाहीत. काल-परवा चक्क शिक्षणाच्या क्षेत्रातील अधिकारीच अडकल्याचे उघड झाले. त्यामुळे पवित्र क्षेत्राला पुन्हा एकदा काळिमा लागली व शिक्षकवर्गालाही धक्का बसला. बातमी खरी असल्याचे शिक्षकांना कळताच आता आपण कोणाचा बोध घेऊन वाटचाल करायची अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात दिवसभर सुरू होती.
- संजय वाघ