नाशिक - राज्यातील नाट्यमय घडामेाडींनंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वतीने बुधवारी रात्री नाशिकमध्येही पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, नव्या सरकारमध्ये नाशिकमध्ये आता कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील नाट्यमय घडामोडी होत होत्या. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या वेळी पेढे वाटपही करण्यात आले. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तांतर होण्याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता होती. ती पूर्ण झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
नव्या सरकारमध्ये नाशिकलादेखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भाजपची सत्ता आल्यास नाशिकमधून कोण मंत्री होणार याविषयी उत्सुकता आहे. नाशिकमध्ये आमदार प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर आणि सीमा हिरे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांचा वारसा म्हणून डॉ. राहुल आहेर यांची दावेदारी यापूर्वीही होती. त्यांच्याबरोबरच आमदार देवयानी फरांदे यांचीदेखील दावेदारी मानली जात आहे.
कोट...
सन २०१९ मध्ये राज्यात आलेले सरकार हे अनिष्ट युती करून सत्तेवर आले होते. तेच आता नाकारले गेले आहे.
- आमदार डॉ. राहुल आहेर
कोट..
जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हेच होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. शिवसेनेच्या आमदारांनाही हे सरकार नको होते. गेली अडीच वर्षे निधी देताना दुजाभाव करण्यात आला.
- आमदार सीमा हिरे
कोट...
अडीच वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेच्या दृष्टीने जनतेने कौल दिला होता. मात्र, राज्यात अनिष्ट युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर होते, आता पुन्हा एकदा जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर येईल.
- आमदार ॲड. राहुल ढिकले