श्याम बागुलनाशिक : ‘माझे नाव घोलप आहे, उमेदवाराच्या मस्तिष्कावरील रेषा पाहूनच मी सांगतो, तो पडणार की निवडून येणार’ असे भविष्य कथन घोलपांच्या नानांनी केले आणि देवळाली मतदारसंघात निवडणूक निकाल जाहीर होण्याअगोदरच नको त्या चर्चांना सुरुवात झाली. भविष्यकार नानांना जर निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या ललाटीच्या रेषा पाहूनच त्याच्या यश-अपयशाचे दूरगामी चित्र दिसत असेल तर नानांचे पुत्र धाकट्या बापूंचे देवळाली मतदारसंघातील राजकीय भवितव्य पुरेपूर अवगत असणे साहजिकच आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापासून स्वत: नाना व त्यांचे पुत्र गावोगावच्या मतदारांना करीत असलेले आर्जव पाहता, नानांची भाविष्यवाणी पुत्र बापूच्या राजकीय भवितव्याच्या चिंतेमुळे तर निघाली नसावी?
घोलप नानांनी गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, ते बहुधा स्वत:च्या स्वत: न पाहू शकणाऱ्या मस्तिष्काच्या रेषांमुळेच. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी खरी मानावयास हवी. मध्यंतरीच्या काळात नानांच्या रेषा पुसटशा झाल्या असाव्यात की काय म्हणून त्यांच्या नशिबात न्यायालयीन निकालामुळे राजकीय विजनवास आला. त्यानंतर नानांनी कदाचित पुत्र योगेश ऊर्फ बापू याच्या मस्तिष्काच्या रेषा बारकाईने अवलोकन केल्या असाव्यात व त्यात त्यांना त्याच्यातील राजयोगाचे दर्शन घडून नानांऐवजी बापू रिंगणात उतरला. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान झालेल्या दिवस-रात्रीच्या दमछाकीमुळे बापूच्या पुसट असलेल्या रेषा आणखीनच ताणल्या जाऊन ठसठशीत कपाळी दिसू लागल्याने बापूला गेल्या निवडणुकीत राजयोगाचे दर्शन झाले. यंदा मात्र बहुधा नानांनी पुत्र बापूसह विरोधी सर्वच उमेदवारांच्या मस्तिष्क रेषांचे अवलोकन बारकाईने केले असावे. तसेही नानांचे साधू-महंत, ऋषी-मुनींविषयी असलेले आकर्षण व अध्यात्माची गोडी मतदारसंघातील सर्वांनाच ठावूक आहे. त्यातही नानांचे हिमालयातील बाबांशी असलेले सख्य पाहता, नानांमध्ये दैवी अवताराच्या अधूनमधून वार्ता प्रसूत होत असतात. कदाचित नाशिक महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान आध्यात्मिक शक्ती अधिक प्रज्वलित झाली असावी व त्यातून नानांना आपल्या कन्या नयना व तनुजा या दोघांच्याही भाळी राजयोगाच्या रेषा ढळढळीत दर्शन देऊन गेल्याने नानांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. नानांना मस्तिष्काच्या रेषा पाहूनच निवडणूक निकाल मतदानापूर्वीच समजत असला तरी, कोठेतरी राहू-केतू आडवे आले आणि नानांच्या दोन्ही कन्यांच्या ललाटीच्या रेषा अदृश्य होऊन त्यांना निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागला. ज्योतिष्यकार नानांची भविष्यवाणी खोटी ठरू शकत नाही, यावर विश्वास असलेल्यांनी दोन्ही कन्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएमच्या यंत्रावर फोडून नानांच्या आध्यात्मिक व धार्मिक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास तसाही कायम ठेवला. त्याचमुळे की काय यंदाच्या निवडणुकीत पुन्हा नानांनी दोन्ही कन्या, पुत्र बापूचे मस्तिष्क चांगलेच न्याहाळून पाहिले आणि त्यात राजरोग फक्त बापूतच दिसल्याने त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. आता प्रश्न फक्त इतकाच की, बापूच्या मस्तिष्काच्या रेषाच जर राजयोगाच्या आहेत तर नानांनी दिवस-रात्र त्याच्यासाठी पायपीट करण्याची गरज ती काय? कपाळाच्या रेषाच जर भविष्य घडविणा-या असतील तर विरोधकांनीदेखील आपले द्रव्य, श्रम व वेळ दवडण्यापेक्षा ज्योतिष्यकार नानांकडे जाऊन बारकाईने स्वत:च्या मस्तिष्काच्या रेषा पाहण्यात गैर ते काय? परंतु देवळालीकर बहुधा नास्तिक असावेत, त्यांचा नानांच्या भविष्यवाणीवर विश्वास नसावा, तसे नसते तर नानांच्या पुत्र बापूची निवडणुकीत इतकी दमछाक करण्याचे पातक त्यांच्या हस्ते कसे घडू शकते? बहुधा यंदा मतदारांनी नानांची भविष्यवाणी खोटी ठरविण्याचे ठरविलेले दिसते त्याचमुळे की काय बापूच्या धूसर झालेल्या ललाटीच्या रेषा पाहूनच नानांना त्याच्या भविष्याची चाहूल लागली असावी व कधी नव्हे ते नानांनी निवडणुकीपूर्वीच मस्तिष्काच्या रेषांवर पराभवाचे खापर फोडण्याची भविष्यवाणी केली असावी.