मिलिंद कुलकर्णीनाशिक महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता या बळावर भाजप ही निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे लवकर पूर्ण करणे आणि नव्या कामांचा शुभारंभ करण्याचे मोठे आव्हान महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांपुढे आहे. राज्य सरकार सहकार्य करीत नाही, अशी कैफियत महापौरांनी मांडली आहे. महापौरांनी त्यासाठी काय प्रयत्न केले, हे जाहीर सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिले आहे. भाजप व शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगणे स्वाभाविक असले तरी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे चित्र दिसू लागले आहे. गिरीश महाजन हे पालकमंत्री असल्याने त्यांनी महापालिका व विधानसभा निवडणूक एकहाती लढवली. सर्वपक्षीयांना भाजपमध्ये प्रवेश देऊन महापालिकेत सत्ता आणली. केंद्र, राज्य व महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता आली तर शहराचा विकास होईल, असे आवाहन त्यावेळी भाजपने केले होते. नाशिककरांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले. मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झाले; मात्र या कामांचा वेग आणि गुणवत्ता याविषयी आता तक्रारी येऊ लागल्या आहेत. महापौर किंवा भाजपचे पदाधिकारी याविषयी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे पक्षांतर्गत भाकरी फिरवली गेली. गिरीश महाजन यांच्याबरोबरच नाशिकची जबाबदारी माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आली. महाजन आणि रावल असे दोन गट तयार झाल्याचे चित्र रंगविण्यात येऊ लागले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी दोन शिष्टमंडळे गेल्याने या गटबाजीला पुष्टी मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुळात या वादात तथ्य आहे काय? हे बघायला हवे. महाजन आणि रावल हे दोघे खान्देशातील नेते आहेत. दोघेही फडणवीस यांच्या विश्वासातील सहकारी आहेत. महाजन यांनी जळगाव पाठोपाठ धुळ्याची महापालिकादेखील ताब्यात घेतली, त्यावेळी रावल त्यांच्यासोबत होते.भाजपमधील विसंवादमहाजन यांच्यापुढे आव्हाने उभी राहिली आहेत, हे खरे आहे. संकटमोचक अशी प्रतिमा असलेल्या महाजन यांच्या गृह जिल्ह्यात दीड वर्षात स्वत: त्यांच्यावर व पक्षावर मोठी संकटे आली. पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि त्यांचा सर्वाधिक राग हा फडणवीस व महाजन यांच्यावर असल्याचे वेळोवेळी दिसून आले. जळगाव महापालिकेत बहुमत असूनही भाजपचे नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले आणि सेनेचा महापौर झाला. बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात महाजन यांच्या काही निकटवर्तीयांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन वर्षे जळगावचे पालकमंत्री होते, त्यांना महाजन यांची बलस्थाने व कमकुवत दुवे माहीत आहेत. नाशिकमध्ये भाकरी फिरविण्यात पाटील यांची भूमिका असू शकते. महाजन आक्रमक आहेत, तर रावल हे शांत व संयमी आहेत. नाशिकमधील स्थिती पाहता रावल यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता पक्षश्रेष्ठींना वाटली असावी. पण म्हणून पक्षात दोन गट तयार झाले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. महापालिकेत सत्ता आणत असताना सर्व पक्षातील मातब्बरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या ताब्यातील महापालिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले नगरसेवक राज्याचे राजकीय चित्र बदलताच घरवापसी वा नवा घरोबा करणार नाही, असे कसे म्हणता येईल. त्यामुळे सत्ता मिळविण्यासोबत हे नगरसेवक टिकवून ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. महाजन व रावल हे एकदिलाने हे आव्हान पेलतात काय, हे नजीकच्या काळात कळेल.
शिवसेनेचा धोरणीपणाभाजपने पाच वर्षांपूर्वी केले, तेच आता शिवसेना करीत आहे. राज्यात पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री आहेत. नगरविकास, उद्योग, पर्यटन अशी महत्त्वाची खाती सेनेकडे आहे. नाशिक शहराचा ठोस विकास आराखडा घेऊन मंत्र्यांकडे जाऊन मंजुरी आणायची, असा प्रयत्न महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महापालिकेतील नेते अजय बोरस्ते, विलास शिंदे यांचा सुरु आहे. निवडणुकीपूर्वी हे झाले, तर सेना नव्या जोमाने व दमाने मतदारांपुढे जाऊ शकेल.