नाशिक : ‘ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते’, असे आणखी एक वादग्रस्त विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी इगतपुरी येथे रविवारी केले. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जाेरदार टीका केली.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाकीची स्थिती निर्माण झाली असून, लोक भाजपवर हसू लागले आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिलं, असे सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असे म्हटले आहे.
बावनकुळेंना ओळखत नाही केंद्रातील सरकारने किती मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले, ती आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. आधी केंद्रातील सरकार किती भ्रष्टाचारी आहे ते बघा, नंतर दुसऱ्याच्या घरावर गोटे मारताना आपले घर किती काचेचे आहे ते पाहावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला. आपण बावनकुळेंना ओळखत नसल्याचेही ते म्हणाले.
पटोलेंचा पुतळा जाळून निषेध
कोराडी (नागपूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे, असे सांगत भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात रात्री येथे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पटोले यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध केला.पटोले यांनी पंतप्रधानांच्या पत्नीचा संदर्भ देऊन केलेल्या विधानामुळे देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. महिला हा अपमान कदापि सहन करणार नाही. नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
देशात एकच मोदी नाहीत - नाना पटोले माझी बायको पळाली म्हणून माझे नाव मोदी, असे त्या गावगुंडानेच सांगितले. त्याच विधानाला घेऊन भाजप बसली आहे. पण, देशात काय एकच मोदी नाहीत. निरव मोदी, ललित मोदीही आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करत आहेत. जितके पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा तुम्हाला जनताच पेटवेल, असे पटोले म्हणाले.