नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ११ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्यापासूनचे वेतन रखडले असून वेतन वेळेत मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे, जिल्ह्यातील ३३२४ शाळांमध्ये सुमारे ११ हजार २२४ शिक्षक कार्यरत आहे. यातील बहुतांश शिक्षकांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतलेले आहे. मात्र त्यांचे वेतन वेळेत होत नसल्याने या कर्जाचे हप्त्यांची नियमित परतफेड करताना शिक्षकांना आर्थिक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. शासकीय कर्मचाऱ्यायंच्या वेतनातून डिसेंबरपासूनच आयकर कपात सुरू होते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वेतनातही कपात झालेली असताना मार्चचे वेतन अद्याप झालेले नसल्याने कर्जाची नियमित परतफेड करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, इतर शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत असताना शिक्षकांच्याच वेतनाला विविध कारणांनी उशीर होत असल्याने शिक्षकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून शिक्षकांच्याच पगारांना उशीर का असा सवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
---
पॉइंटर -
जिल्ह्यातील जि.प. शाळा - ३३२४
एकूण शिक्षक ११ हजार २२४
--
कर्जाचे हप्ते, घर खर्च कसा करणार
प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळवर होत नसल्याने गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्त्यांची नियमित परतफेड करण्यात अडचणी येत असून विनाकारण व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने घरखर्चाचाही शिक्षकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
- सोपान खैरनार, प्राथमिक शिक्षक
--
नियमित वेतन ५ तारखेच्या आत होणे अपेक्षित असताना अनेकदा महिना अखेरला वेतन होत असते. सध्या कोविड परिस्थितीमुळे वेतन रखडल्याने शिक्षक समजून घेत असले तरी अशाप्रकारे वेतन थकल्याने शिक्षकांचे नियोजन कोलमडते, हेही शासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
-चंद्रकात महाजन, प्राथमिक शिक्षक,
---
शिक्षकांची आर्थिक कोंडी
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच व्हावे, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे. परंतु अनेकदा २० तारीख उलटूनही शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होत नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होत असते. अनेक शिक्षकांनी कर्ज काढून घर किंवा वाहन घेतले असून वेळेच वेतन झाले नाही, तर शिक्षकांना विनाकारण व्याजाचा व दंडाचा भुदंड सोसावा लागत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
--
प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील काही शिक्षकांनी डीसीपीएस व एनपीएस योजनांच्या अर्जांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे सर्वच शिक्षकांचे वेतन रखडले आहे. सध्या १३ तालुक्यांची पूर्तता झाली असून कळवण व सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांनी त्यांच्या अर्जांची पूर्तता केली नाही. इगतपुरी तालुक्यातूनही ५० टक्के शिक्षकांनी पूर्तता केलेली नाही. त्यामुळे मार्चचे वेतन रखडले आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करून सोमवारपर्यंत वेतन होण्याची शक्यता आहे.
राजीव म्हसकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक