------------------------------------------------
सांगा सफरचंद कोणी पाहिले?
मुंबईहून सफरचंदांनी भरलेला एक ट्रक छत्तीसगडच्या दिशेने निघाला होता. ३३ लाख रुपयांचा निर्यातक्षम प्रतीचा माल गाडीत असल्याने चालकावर दडपण होते. घोटी-सिन्नर रस्त्यावरील धामणी गावाजवळ दुर्दैवाने तो ट्रक उलटला आणि एक आयतीच संधी वाटमारी करणाऱ्यांकडे चालून आली. एखादा ट्रक पलटी झाल्यावर त्याच्यातील मालाची हातोहात लूट होणे हे तसे नवीन राहिले नाही. या दुर्घटनाग्रस्त ट्रकमधील सफरचंदांचेही तसेच झाले. एक सफरचंदही फुकट्या लोकांनी शिल्लक ठेवला नाही. हा सफरचंदांनी भरलेला ट्रक होता हे चालकाने जगाला कितीही ओरडून सांगितले असते तरी ते कोणाला खरे वाटले नसते. परंतु पोलिसात तक्रार तर नोंदवावीच लागणार होती. घोटी पोलिसांनी अंगवळणी पडलेल्या सवयीप्रमाणे तक्रार नोंदवायला आढेवेढे घेतले. परिणामी तक्रार नाशकात नोंदविली गेली. मात्र संशयित म्हणून कोणाचे नाव नाही आणि जे स्वत:च लूटमारीत सहभागी होते ते तरी साक्षीदार म्हणून कसे पुढे येतील. अशावेळी सफरचंदचोरांचा शोध घ्यावा तर तो कसा, हा मोठा पेच पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
- संजय वाघ