ओझर (सुदर्शन सारडा) : पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? पोलिसांना बळाचा वापर का? करावा लागतो याचे उत्तर आपण तपासले तर ते आपणा सर्वांच्या आरोग्य सुदृढतेसाठीच आहे हे सर्वार्थाने सिद्ध होतं.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे नागरिकांना भावनिक साद घालत नियमांचे पालन करण्याबरोबर स्वतःची काळजी घेण्या संदर्भात आवाहन केले आहे.
'खरे म्हणजे आज माझ्या ग्रामीण जनतेला नम्र आवाहन करण्यासाठी आपल्याशी बोलत आहे.
वाढते कोरोना संक्रमण, लॉकडाऊन, कायदा सुव्यवस्था, गावागावांत होणारी प्रचंड गर्दी व त्यातून वाढणारा बधितांचा आकडा हा चिंतेचा विषय ठरू पाहत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपली सर्वांची साथ लागणार आहे हे मात्र आज स्पष्ट करू इच्छितो.
---------------
मास्क हेच कवच
खरे तर अनेकांच्या परिवारातील कर्ते कोविडमुळे साथ सोडून गेले याचे शल्य आहेच. परंतु आपण काळजी कधी घेणार हे सर्वप्रथम मी आपणास विचारू इच्छितो ? आज घडीला मास्क हेच प्राथमिक कवच बनले आहे. ती खिशात घालून फिरण्याची वस्तू आहे का? असे अनेक लहान प्रश्न तुमच्या मनात असताना त्याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे, मग हा हलगर्जीपणा का होतोय हा मूळ मुद्दा आहे. का म्हणून पोलीस कार्यवाहीची वाट बघावी? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
---------------------
नियम पाळा, कारवाई टाळा...!
आजपर्यंत अनेक आमच्या पोलीस बांधवांना, भगिनींना कोरोनाची लागण झाली, त्यातील अनेकांनी हे जग सोडलं. परंतु नागरिकांना सतर्कतेच्या कमानीत ठेवण्याचे काम आजही २४ तास अविरत सुरू आहे आणि ते कर्तव्य आम्ही एकसंघपणे करतच राहू. परंतु यात आपल्या सर्वांचीच साथ लागणार आहे. आज वाढणारी भीषण परिस्थिती बघितली तर कोरोनाची दुसरी लाट गंभीर असली तरी, पोलीस प्रशासन खंबीर आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र होऊ यात आणि नियमांचे काटेकोर पालन करूया.
कोरोनाचे नियम पाळा व कारवाई टाळा, असे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.