नाशिक : ब्रिटीशांप्रमाणे या देशाच्या अनेक फाळण्या करण्याचे प्रयत्न बहुदा राहुल गांधी यांना करायचे असावे, असेच त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येते. त्यांनी ज्यावेळी भारत जोडो यात्रा काढली, त्यावेळी ती पाकव्याप्त काश्मीर किंवा चीनने बळकावलेल्या अक्साई चीनमधून का काढली नाही ? भारताचे ते भूभाग कँग्रेस राजवटींच्या काळात त्या देशांनी गिळंकृत केले हे गांधी विसरले असले तरी देश विसरणार नसल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार देवयानी फरांदे, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, नाशिक ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, प्रवीण अलई, पवन भागुरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते.
संजय राऊत यांनी सत्ता जाण्याबाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना आपल्या देशात स्वप्न बघण्याचे स्वातंत्र्य सर्वांना असून राऊतदेखील दिवास्वप्न बघत असल्याचे भांडारी यांनी नमूद केले. पालकमंत्री पदाबाबत कोणताही संभ्रम नाही. त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्व अधिक हा मुख्यमंत्र्यांना असल्याचेही भांडारी यांनी सांगितले.१४ ऑगस्टला वेदनांचे स्मरण -भाजपातर्फे १४ ऑगस्टला ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार असून त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस १४ ऑगस्टला फाळणीच्या वेदनांचा हा स्मृती दिवस पाळण्यात येणार असल्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे. देशाचे विभाजन झाल्याच्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन भांडारी यांनी केले.