नाशिक : सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे महाराष्ट्र सदनातील पुतळे हलविण्याचा विषय असो वा इंडिया टेल या पोर्टलवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या प्रश्नावर डॉ. प्रकाश आंबेडकर काहीच का बोलले नाहीत, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेची कामे करायची असेल तर सत्तेतच राहणेच कसे योग्य आहे, असे लिखाण केले आहे. ते बहुधा प्रकाश आंबेडकर यांनी वाचले नाही का, असा टोला लगावला.
आम्ही महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत, असे सांगून संसदेतील पुतळे हलविण्याचा विषय असो वा आक्षेपार्ह लिखाणाच्या विषयावर. मात्र आंबेडकर काहीच का बोलले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला. पुतळे हलविण्याच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन केल्यानंतर सरकारने त्याबाबत खुलासा केला आहे. आता हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी येत्या अधिवेशनात जाब विचारण्यात येईल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.