लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीला आठवडाभराचा कालावधी उरलेला असताना अनिल अवचट यांच्यासारख्या कृतीशील साहित्यिकाने अध्यक्ष पदाच्या चर्चेत राहण्यासदेखील नकार दिला आहे. मात्र, हे प्रथमच घडलेले नसून यापूर्वीदेखील खूप मोठमोठ्या साहित्यिकांनी अध्यक्षपदाला नकार दिलेला होता. साहित्य क्षेत्रातील हे सर्वोच्च असे अध्यक्षपद मोठे साहित्यिक का नाकारत आहेत ? त्याचाही विचार साहित्य महामंडळाने करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
काही वर्षांपूर्वी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची दगदग सहन न झाल्यामुळे बलुतंकार दया पवार आणि मृत्युंजयकार शिवाजी सावंत हे ज्येष्ठ साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे निवडणूक लढवण्याची धावपळ नको, तसेच अशी निवडणूक लढवणे तत्वातही बसत नाही म्हणून अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी पूर्वीच्या काळी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरण्यास नकार दिल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, त्यानंतर संमेलन अध्यक्षपद हे सन्मानाचे पद असून, ते सन्मानानेच दिले जावे, अशी भूमिका मांडली गेल्यानंतर गत तीन वर्षांपासून पुन्हा साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद हे महामंडळाच्या विविध शाखांनी सुचवलेल्या नावांतून निवडले जाऊ लागले आहे. मात्र, तरीदेखील अनेक साहित्यिकांनी आतापर्यंत निवड निश्चित असूनही संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास का नकार दिला आहे ? त्याचा विचार होणे अत्यावश्यक आहे. दरम्यान अवचट यांनी नकार दिल्याने सासणे यांच्यासाठी रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
इन्फो
नेमाडे, महानोर, अवचट का नाकारतात ?
मराठी रसिकांच्या मनात साहित्य संमेलनांना सर्वोच्च स्थान असूनही ज्ञानपीठसारखा साहित्यातील सर्वोच्च सन्मानप्राप्त साहित्यिक कोसलाकार भालचंद्र नेमाडे, निसर्गकवी ना. धों. महानोर आणि आता अनिल अवचट यांच्यासारखा लोकप्रिय साहित्यिक या अध्यक्ष पदाला का नाकारतात ? जर नेमाडे, महानोर यांच्यासारखे प्रचंड प्रतिभावान साहित्यिक अध्यक्षपद नाकारत असतील तर त्यांच्या नकारामागे संमेलनांचा घसरलेला स्तर हे कारण असण्याची शक्यता अधिक आहे. मग असे महान साहित्यिक नाव सुचवू देण्यासदेखील नाही म्हणतात, असे कारण पुढे करून महामंडळ त्यांच्या नावांचाच विचार करणार नसेल तर ही अध्यक्ष नियुक्तीची पद्धत आणूनही काहीच उपयोग झालेला नाही, असेच म्हणावे लागले. अनेक दिग्गज साहित्यिक अध्यक्षपदाच्या बहुमानापासून वंचित राहिलेत, हे वास्तव आहे. अनेक विद्वानांना नियुक्तीने दिल्या जाणाऱ्या अध्यक्ष पदाकडेदेखील पाठ फिरवावीशी वाटण्याचे कारण जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.
लोगो
साहित्य संमेलनासाठीचा लोगो अवश्य वापरावा.