नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्टरोडसह अन्य अनेक विषयांतून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनामा देऊ असे म्हणतात, मग राजीनामा का देत नाही, असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्त्या आणि ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे.स्मार्टरोडच्या रखडलेल्या कामावरून हेमलता पाटील यांनी सोमवारी (दि.२२) आंदोलनदेखील केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी कंपनीच्या संचालकांवरदेखील टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. परंतु मोदी यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेची वासलात लावण्याचा विडाच उचलला आहे. शहरात कामे करताना कोणती विकासकामे केली पाहिजे आणि त्याचा नाशिककरांना फायदा होणार आहे, याची माहिती नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मिळत नाही. कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यान, कलादालन या प्रकल्पांवर निविदेच्या पलीकडे जाऊन मोठा खर्च झाला आहे. ग्रीन सिटी प्रकल्प शेतकºयांवर लादण्यात आला आहे. पॅन सिटी व वॉटर सप्लाय प्रोजेक्ट यासंदर्भात सत्ताधिकारी पक्षाच्या आमदारांनीच बहिष्कार घालून या योजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील स्काडा मीटर प्रकरणी कंपनी अध्यक्षांनी निविदा रद्द केल्यानंतर बैठकीतच त्या गैरसमजामुळे झाल्याचे सांगून हीच प्रक्रिया कार्यान्वित केली. ज्या संचालकांनी या प्रकल्पाला विरोध केला तेच संचालक या बैठकीस उपस्थित होते. काही संचालक स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून राजीनाम्याची भाषा करतात. परंतु अद्यापपर्यंत कोणीही राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.बैठकीत विरोध न करण्याचे कारण काय?स्मार्ट सिटीच्या बैठकीस उपस्थित राहून विरोध करून तशी अधिकृत नोंद बैठकीच्या इतिवृत्तात करण्याऐवजी बाहेर माध्यमांसमोरच केवळ का चर्चा करतात, असा प्रश्न हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे.
स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:57 PM