धोकादायक: गुन्हेगारांकडून होतोय वापर
इंदिरानगर: वर्षानुवर्ष पडीक असलेल्या विहिरींमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे तर गुन्हेगारांसाठी अशा विहिरी गुन्हा लपविण्याचे साधन झाल्याने शहरातील अशा विहिरी बुजवल्या का जात नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागावनजिक विहिरीत आढळलेल्या मृतदेहावरून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. विशेषत: गावठाण शिवारात असलेल्या विहिरी गुन्हेगारीला निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत.
गाव शिवारात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या पडीक विहिरी असून अनेकदा त्या दिसूनही येत नाहीत. त्यामुळे त्यामध्ये जनावरे पडण्याच्याही घटना घडतात अशा प्रकारचा अपघात असला तरी पडीक विहिरींमध्ये मृतदेह फेकून देण्याबरोबरच गुन्हेगारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे टाकण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहे. ही सर्वात मोठी गंभीर बाब असल्याने या पडीक विहिरी बुजवण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी वडाळा गावाजवळील पडीक विहिरीत चोरीस गेलेल्या चार ते पाच दुचाकी आढळून आल्या होत्या. गेल्या दोन वर्षात दोन खून करून परिसरातील पडीक विहिरीत टाकल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा तसेच एका इसमाचा मृतदेह आढळून आलेले आहेत.
एक वर्षापूर्वी शीर व दोन्ही हात नसलेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह पेठेनगरचा मोकळ्या मैदानातील पडीक विहिरीत तरंगताना आढळून आला होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता साठेनगर पाठीमागील एका पडीक विहिरीत पस्तीस ते चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात येऊन विहिरीत टाकण्यात आल्याची घटना उघड घडली आहे.
परिसरातील पडीक विहिरीत खून करून दगडास बांधून मृतदेह टाकण्याचे जणूकाही सूत्रच बनले आहे. परिसरातील पडीक विहिरींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने त्याचा दुरुपयोग होत असल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने पोलीस आणि पालिका प्रशासनाने यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.
--इन्फो-
या ठिकाणी आहेत पडक्या विहिरी
श्रद्धा विहार कॉलनी- दोन-तीन पडीक विहिरी, पेठेकर मैदान, पेठे नगर रस्त्यावरील अभ्यासिका शेजारी, शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकात रस्त्याच्या मधोमध, यासह परिसरात मोकळ्या मैदानात दोन ते तीन पडीक विहिरी आहेत. या केवळ वडाळागाव, इंदिरानगर येथील विहिरी आहेत. संपूर्ण शहरात अशा अनेक विहिरी असून त्या मनपाने ताब्यात घेऊन बुजविणे अत्यावश्यक झाले आहे.