मराठीचा आग्रह धरणे तसे गैर नाही. त्यातच महापालिका प्रशासनाने उत्साहाने मराठीविषयी ममत्व दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मराठीचे संवर्धन महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांनी करायचे नाही तर कोणी करायचे, असा प्रश्न सहज कोणीही विचारू शकतो; मात्र मराठी हा केवळ भाषा, साहित्य, स्वाभिमान आणि मातृभाषेचाच विषय आहे, असे नाही तर तो राजकारणाचादेखील विषय आहे. शिवसेना आणि मनसेकडून आळीपाळीने हा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर असून आजवर कधी नाही तर यंदा प्रथमच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने नोटीस बजावल्याने प्रशासनाचा हेतू नक्की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुळात दुकानांची आस्थापना हा विषय कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील आहे. मुंबई महापालिका वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी जो कायदा करण्यात आला आहे, त्यात हे स्पष्ट करण्यात आले असून त्यामुळेच मराठी पाट्या हा विषयदेखील त्यांच्याच अखत्यारीत असताना महापालिकेने मराठी पाट्यांबाबत उत्साह दाखवण्याचे कारण काय, असा प्रश्न आहे. त्यातच कोरोनामुळे मुळातच व्यापारी, व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. अनलॉकनंतर आत्ताशी कुठे व्यवसाय सुरळीत होईल अशी चिन्हे आहेत. स्थानिक पालकसंस्था म्हणून महापालिकेने घरपट्टीत दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. हा विषय आपल्या अधिकारात असताना त्याकडे लक्ष नाही आणि अधिकार क्षेत्र नसलेल्या ठिकाणी मात्र उत्साह यामुळेच व्यापारी, व्यावसायिकात नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
इन्फो...
आता मनुष्यबळ कुठून आले?
कोरोनाचा फटका महापालिकेलादेखील बसला असून सुमारे चारशे कोटींनी उत्पन्न घटले आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेत दिली गेली नाही. त्यासाठी अपुरे मनुष्यबळाचे कारण प्रशासन पुढे करीत आहे. मग मराठी पाट्या बसवा, अशा नोटीस बजावण्यासाठी मनुष्यबळ कोठून आले, हा एक प्रश्नच आहे.
इन्फो..
तेव्हा कुठे जातो मराठा बाणा
१. मराठीची सक्ती करणाऱ्या महापालिकेचा मराठीतील कारभार कसा चालतो, याचे साधे उदाहरण द्यायचे तर मध्यंतरी ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या स्मृती जपण्यासाठी उड्डाणपुलावर लावलेला फलकदेखील शुद्ध मराठीत नव्हता. काही संस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेला चूक सुधारावी लागली.
२. चार वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (म्हणजेच कंप्लिशन सर्टिफिकेट) मराठीत दिले जात होते. ते ऑटोडीसीआर आल्यापासून इंग्रजीत दिले जाऊ लागले.
३. महापालिकेच्या विविध कामांच्या निविदा वृत्तपत्रातून देताना सोयीच्या काही निविदा इंग्रजीत आणि काही मराठीत दिल्या जातात, तेव्हा इंग्रजीचा वापर का केला जातो?
४. महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. १२८ शाळांपैकी आता अवघ्या ९० शाळाच शिल्लक आहेत. तेथे लक्ष का पुरवले जात नाही?