नाशिक : शहरात मोकळा भूखंड किंवा सोसायटीची खुली जागा दिसली की कर उद्यान या महापालिकेच्या धोरणामुळे शहरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल चारशे उद्याने फुलली खरी; परंतु देखभाल दुरुस्तीत सातत्य नसल्याने मोजकी उद्याने वगळता सर्व उद्यानेच भकास झाली आहेत. गणेशवाडीतील उद्यानाचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. पंचवटीतील गणेशवाडी परिसरात महापालिकेच्या वतीने मोठे उद्यान विकसित केले आहे. परंतु त्याची कोणत्याही प्रकारे देखभाल केली जात नसल्याने तेथे झुडपे उगवली आहेत. खेळण्या मोडल्या असून, मुलांना त्याचा कोणताही उपयोग होत नाही. सध्या तर शाळांना सुट्या असल्याने मुलांना परिसरातील उद्याने किंवा मोकळे मैदान यांची नितांत गरज असते. परंतु गणेशवाडीसारख्या शहराच्या मध्यवस्तीतील उद्यानातील दुरवस्थेमुळे ते मुलांना खेळण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. उद्यानाची अवस्था बघता मुलांना खेळणे मुश्कील झाले आहे. महापालिकेने नवीन उद्याने बांधण्यापूर्वी मुळातच यापूर्वीच्या उद्यानांची अवस्था बघून त्यांची दुरुस्ती करावी आणि नंतरच उद्याने विकसित करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे मुलांची खेळण्याची सोय होऊ शकेल.
शहरात उद्याने हवीतच कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:35 AM