जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सोमवारी (दि.१८) ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार डॉ. भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मात्र, ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी ‘तजवीज’ करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१पर्यंत होणाऱ्या या अभियानात विद्यार्थ्यांना देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक माहिती वेळोवेळी दिली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. येवला येथे तयार करण्यात आलेला ‘ट्रॅफिक पार्क’ प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) स्वत:च्या ताब्यात घेऊन या माध्यमातून जनसामान्यांमध्ये सर्वच प्रकारच्या वाहतूक नियमांची जनजागृती करण्यावर भर द्यावा, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता ऑनलाइन पास उपलब्ध करून देण्यात आले, ही अत्यंत चांगली बाब ठरली, असे सूरज मांढरे यांनी यावेळी मनोगतातून सांगितले. दरम्यान, ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका’ व रस्ता सुरक्षेबाबतच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
---इन्फो--
अवजड वाहनचालकांचे प्रशिक्षण शिबिर घ्यावे
मालट्रक, ट्रेलर, कंटेनरसारखी अवजड वाहने चालविणाऱ्या चालक-वाहकांचे दर दोन वर्षांनी आरटीओने प्रशिक्षण शिबिर घेत त्यांना वाहतूक नियमांविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करावा, असाही सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला. अपघातस्थळी अपघातग्रस्त व्यक्तींना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी आजही सर्वसामान्य व्यक्ती घाबरतो, त्यामुळे अनेकदा अपघातातील जखमींना प्राण गमवावे लागतात. हे टाळण्यासाठी अपघातातील जखमींना मदतीसाठी पुढे यावे, या उद्देशाने जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले.
----
फोटो : १८पीएचजेएन९१ :-
कॅप्शन : रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत व्यासपीठावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कैलास जाधव, भरत कळसकर, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, दीपक पाण्डेय आदी.