पाळेखुर्द : एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे येथील आदिवासी वस्तीत गावठी दारूची मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री आहे. कोरोनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन होत असतानादेखील पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाळेखुर्द हे सर्वांत मोठे बीट असताना कोरोना काळात बीटमध्ये काय परिस्थिती आहे, कोविड नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी इकडे फिरकला नाही. त्यामुळे मद्यपी व दारू विक्रेत्यांच्या मनात पोलिसांविषयी धाक न उरल्याने गावठी दारू विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. शेजारील पाळे बुद्रूक व आसपासच्या खेड्यातील मद्यपी येथे विनामास्क येतात त्यामुळे गावात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. शेजारील मोकभनगी, हुंड्यामोक, दरेभणगी, जयदर आदी गावांतून दारू पुरवठा होत असून, त्याची येथील व्यावसायिकांकडून विक्री केली जात आहे. पोलिसांनी या अवैध दारू विक्रीला पायबंद लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.गावठी दारू विक्रीबाबत वारंवार तक्रार करूनसुद्धा अभोणा पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. तसेच दक्षता समिती सभेतसुद्धा यासंदर्भात काही विचार केला जात नाही.- अशोक पाटील, पोलीसपाटील, पाळेखुर्द
नागरिकांनी ऑनलाइन ग्रामसभा घेऊन त्यात गावठी दारू विक्री बंद करण्याचा ठराव करावा. तो ठराव ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवायला. त्यानंतर आपोआप कारवाई होईल.- अमित देवरे, नागरिक, पाळेखुर्द