नाशिक : शहरातील रविवार कारंजावरील सुप्रसिद्ध दगडू तेली चांदवडकर यांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या दुकानात पश्चिम वनविभागाच्यानाशिक वनपरिक्षेत्राच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत दुकानातून मोठ्या प्रमाणात घोरपडीचे लिंग (हातजोडी), साळींदरचे काटे, बारशिंगा, चौसिंगासारख्या हरणांच्या शिंगांचे तुकडे आदी अवयव पथकाने जप्त केले आहेत. वन विभागाच्या या कारवाईने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार कारंजा बाजारपेठेत तेली गल्लीमध्ये सुखलाल दगडु तेली चांदवडकर यांच्या मालकीचे सुकामेवा, काष्ट औषधी, वनौषधी विक्रीचे तीसऱ्या क्रमांकाचे दुकान आहे. या दुकानात काही वन्यजीवांचे अवयवदेखील बाळगण्यात आले असून त्याची चोरी-छुप्या पद्धतीने विक्रीही केली जात असल्याची गोपनीय माहिती वनविभाग नाशिकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने खात्री पटविली आणि वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, इगतपुरीचे केतन बिरारीस यांनी त्वरित पथक तयार करुन सोमवारी (दि.४) संध्याकाळच्या सुमारास छापा टाकला. यावेळी दुकानाच्या झडतीसत्रात काही खोक्यांमध्ये व बाटल्यांमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे संशयित सुखलाल चांदवडकर यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या विविध कलमान्वये वनक्षेत्रपाल नाशिक यांच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, चांदवडकर यांना चौकशीसाठी वनकार्यालयात आणण्यात आले असून या गुन्ह्याची चौकशी व पुढील तपास पूर्ण होईपर्यंत दुकान कुलुपबंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भदाणे यांनी दिली.