संजय पाठक, नाशिक : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहरात सामान्य नागरिक भयभीत होणे अपेक्षितच आहे. मात्र, त्यासाठी एका भागातील दुकाने बंद करण्यात आली आणि पाठोपाठ जणू नाशिकमध्ये साथच पसरली. एकापाठोपाठ एक सर्वच उपनगरात दुकाने बंद करण्यात आली. अर्थात, त्या मागे राजकीय दबाव होताच, परंतु त्यामुळे नियमित जीवनचक्र सुरू करण्याच्या प्रयत्नांनाच खीळ बसली आहे. मुळात दुकाने सुरू झाली, परंतु ती सुरू करताना जी पथ्य पाळायची आहेत, तिचे पालन झालेले नाही आणि आता दुकाने बंद करून काय साध्य होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचे महासंकट आले तेव्हा गेल्या मार्चच्या उत्तरार्धात देशपातळीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यातून देशपातळीवर अर्थचक्रच लॉक झाले. परिस्थिती गंभीर असल्याने साऱ्यांनी पोटाला चिमटे काढून लॉकडाऊनमध्ये सहभाग दिला; परंतु लॉकडाऊनचे दुसरे तिसरे टप्पे सुरू झाल्यानंतर मात्र सर्वच उद्योग व्यावसायिक अगतिक झाले. व्यवहार सुरळीत करण्यासाठी दबाव वाढू लागला. दुकाने सुरू करण्यासाठी या ना त्या मार्गाने प्रशासनाकडे प्रयत्न सुरू होऊ लागले. आधी पहिल्या टप्प्यात उद्योग आणि नंतर दुकाने सुरू झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले म्हणून अनेक व्यापारी व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला. मात्र आता हेच सारे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होऊ लागले आहेत.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या भयावह वाढली असून, त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मेनरोडसारख्या बाजारपेठेत गर्दी ६ जूनपासून प्रचंड गर्दी वाढली, आरोग्य सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले गेले, तेव्हाच धोक्याची वर्दी मिळाली होती. मात्र, त्यावेळी अगदी सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यासदेखील विरोध करणा-या काही व्यापा-यांनी आपल्यास्तरावर कापडपेठ, सराफबाजार, भांडीबाजार टप्प्याटप्याने बंद करण्याचे ठरविले. मात्र, त्यात राजकारण्यांनी उडी घेतली आणि आठ दिवस दुकाने बंद करण्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर काही नेत्यांनी दुकाने बंद करण्यासाठी दबावदेखील आणले. त्यानंतर महापालिकेने दुकाने बंद करणाºयांवर कारवाईचा इशारा दिला खरा; परंतु बहुधा राजकारण्यांच्या दबावापुढे तेही झुकले.मेनरोडला बाजारपेठा बंद होताच अन्यत्र सिडको-पंचवटी आणि नाशिकरोड येथील दुकाने बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले. सुरुवातील काही दिवस दुकाने बंद झाली; परंतु नंतर मात्र प्रत्येकाने सोयीची भूमिका घेतली. नाशिकरोड येथील किराणा व्यावसायिकांनी मॉलमधील किराणा दुकानाकडे ग्राहक वळतात म्हणून बंद मागे घेतला. खरे तर पाच ते आठ दिवसांच्या बंदमधून कोरोनाची रुग्णसंख्या खरोखरीच कमी होईल?
मुळात आता शासनाचे आता कोरोनाबरोबर जगायचं ही भूमिका जाहीर केली आहे. सर्वच अर्थचक्र बंद राहिले तर सरकारवरील ताण तर वाढेल आणि रोजी रोटी नसेल तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आता साºयांनीच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर हे निदान काही महिने तरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवून ठेवले पाहिजे, परंतु अशी काळजी न घेता केवळ दुकाने सुरू ठेवली तर कोरोनावर नियंत्रण आणता येईल? मुळात एका भागातील दुकाने बंद झाली तर नागरिक दुस-या भागातील दुकानात गर्दी करतात. याशिवाय मेनरोडसारखी बाजारपेठ सुरू होईल तेव्हा त्या भागातील खरेदीसाठी पुन्हा गर्दी होणारच आहे. तेव्हा काय करणार? त्यामुळे आता सुरक्षा नियमांचे पालन करून व्यवहार करणे हेच इष्ट असून, अर्थचक्र सुरू ठेवण्यातच सा-यांचे हित आहे.