नाशिक : पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हाती सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे बाहेर पडत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे एक नव्हे तर शेकडो घोटाळे करणाऱ्यांच्या हातात पुन्हा देशाची सत्ता देणार काय, असा सवाल करीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, केंद्रात हिंदुत्ववादी सरकार नको म्हणून बिनबुडाचे व बिनचेहºयाचे अनेक लोक निव्वळ सत्तेसाठी एकत्र आल्याचा आरोप केला.बुधवारी येथील गोल्फ क्लब मैदानावर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपालसिंग महाराज, सेना प्रवक्ते संजय राऊत, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यावेळी उपस्थित होते. आपल्या अर्धातासाच्या भाषणात ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले, पाच वर्षे सत्तेत एकत्र असताना भाजपशी अनेक मुद्द्यांवर मतभेद जरूर होते. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाणार प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. परंतु सेना-भाजपा एकत्र येणार नाही, म्हणून डोळा ठेवून असलेल्या कॉँग्रेस व राष्टÑवादीने सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.पुलवामा घटनेचा संदर्भ देत ठाकरे यांनी, देशाच्या रक्षणासाठी लढणाºया सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करू नये हे मान्य; परंतु ज्यांनी प्राणाची बाजी लावून फुटीरतावादी व आतंकवाद्यांना त्यांच्या घरात शिरून मारले त्या सैनिकांच्या शौर्याविषयी नाना प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी त्यांचे खच्चीकरण तरी करू नये असे सांगतानाच, सैनिकांच्या शौर्याविषयी प्रश्न उपस्थित करणाºया शरद पवार यांचे कर्तृत्व तरी काय, असा सवाल केला. आत्महत्या केलेल्या एकाही शेतकºयाच्या घरी सांत्वनासाठी न गेलेल्या पवार यांनी गुजरातमध्ये मारल्या गेलेल्या इशरत जहॉ या अतिरेक्यांशी संबंधित असलेल्या महिलेच्या घरी जाऊन सांत्वन करावे यापेक्षा देशाचे दुर्दैव कोणते, असा सवालही ठाकरे यांनी केला.यावेळी बोलताना सतपालसिंग महाराज म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीमुळे जगातील सर्व देश भारताच्या पाठीशी उभे राहिले असून, त्यामुळेच विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानातून परत येऊ शकला. सैन्याचे तीन दल असतात; परंतु आता भारताने अंतरिक्षातदेखील आपली ताकद मजबूत केल्याने भारताकडे यापुढे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही, असेही शेवटी ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस उपनेते मिलिंद नार्वेकर, खासदार व उमेदवार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप, बबनराव घोलप, भाऊ चौधरी यांच्यासह सेना-भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.‘ते’ संघटित होतात मग आपण का नाही?या निवडणुकीत विशिष्ट समुदायाने भाजपाला मतदान करायचे नाही, असे ठरवले आहे. सटाणा येथे यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. या मतदारसंघात या समुदायाची पाच लाख मते असून, ती मिळणार नसल्याने तेथील उमेदवार धास्तावले आहेत. अशाप्रकारे पाच लाख मते संघटित होत असतील तर मग उर्वरित पंधरा लाख मतदारांनी पण का संघटित होऊ नये, असे धक्कादायक विधान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले.
घोटाळेबाजांच्या हातात देशाची सत्ता देणार काय? : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:27 AM