नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांनी विजय प्राप्त केला. पण पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पराभव झाला असला तरी अजिबात खचून जाणार नाही आणि शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही, असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.
"४० हजार मतं पडणं हे एका सामान्य घरातील लेकीसाठी फार विशेष आहे. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही", असं शुभांगी पाटील म्हणाल्या. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष नाशिक पदवीधर मतदार संघाकडे लागून होतं. कारण नाशिक पदवीधर मतदार संघात गेल्या महिन्याभरापासून नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. त्यावर अखेर आज पडदा पडला आहे.
"माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून मला ४० हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते. महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. यात जुन्हा पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी १५ वर्ष म्हणजेच तीन टर्म हे सगळ्यांना माहित आहे. आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. मी माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार", असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले. सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर ६८ हजार ९९९ मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला.