नाशिक : भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता आजी-माजी उपमहापौर राजीनामे देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांच्या बळावर नगरसेवक पदाची उमेदवारी पदरात पाडून घेणारे त्यांचे समर्थकसुद्धा आपल्या नेत्यांचे समर्थन करणार की आपले पद वाचविण्यासाठी भाजपला चिकटून राहणार, या विषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आपापले पक्ष सोडून वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही भाजपमध्ये दाखल झाले. दोघेही खरे तर मूलतः शिवसैनिकच. परंतु नंतर दोघेही अनुक्रमे मनसे आणि राष्ट्रवादी या पक्षात गेले आणि नंतर तेथून भाजपात आले. भाजपने दोघांनाही प्रदेश पातळीवर पदे दिलीच, शिवाय त्यांच्या समर्थकांनादेखील २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत तिकिटे दिली. त्यातील अनेक जण निवडून आले. गीते यांचे पुत्र प्रथमेश आणि सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागूल यांनाही उमेदवारी दिली. शिवाय पक्षातील जुन्या निष्ठावानांना डावलून त्यांना उपमहापौरपदेही दिली. मात्र आता एवढे करून या नेत्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे उपमहापौर भिकूबाई बागुल आणि माजी उपमहापौर प्रथमेश गीते हे नैतिकता म्हणून राजीनामे देऊन शिवसेनेत प्रवेश करणार काय, असा प्रश्न आता केला जात आहे.भाजपची अगतिकताअन्य पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे समर्थन करणारे किंवा त्यांचे समर्थक म्हणून पदे मिळणाऱ्यावर भाजपचे नेते कारवाई करण्याच्या तयारीत नाही. दोघे नेते पक्षांतर करत असल्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात असताना पक्षाचे नवे महानगर प्रमुख किंवा संघटन मंत्रीदेखील नाशकात येऊन डॅमेज कंट्रोल करू शकले नाही. त्यामुळे भाजपाची अगतिकता आणि दुर्बलतादेखील दिसत आहे. भाजयुमोचे शहराध्यक्षपद सुनील बागुल यांचे पुत्र मनीष यांच्याकडे असून सुनील बागुल यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी त्यांना हे पद देण्यात आले होते. त्याबाबत देखील पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागून आहे. गीते आणि बागुल यांच्या समर्थकांना देण्यात आलेल्या पदाबाबत पक्षांतराच्या निर्णयामुळे चर्चा सुरु झाली असून, यापुढे आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.‘त्या’ नगरसेवकांचे कायn असाच प्रश्न आता गीते आणि बागुल यांच्या समर्थकांच्या बाबतीतदेखील आहे. ज्यांनी आपल्याला भाजपची उमेदवारी दिली, ते नेतेच भाजपात नसतील तर तेदेखील भाजप नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन शिवसेनेत सहभागी होणार का? की नगरसेवक पदाचा मोह त्यांना किमान निवडणुका जाहीर होईपर्यंत भाजपातच ठेवणार? असा प्रश्न केला जात आहे.
आजी-माजी उपमहापौर आता पदाचे राजीनामे देणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:46 AM
भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता आजी-माजी उपमहापौर राजीनामे देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांच्या बळावर नगरसेवक पदाची उमेदवारी पदरात पाडून घेणारे त्यांचे समर्थकसुद्धा आपल्या नेत्यांचे समर्थन करणार की आपले पद वाचविण्यासाठी भाजपला चिकटून राहणार, या विषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
ठळक मुद्देपक्षांतराचे पडसाद : अन्य समर्थकांच्या भूमिकेविषयी उत्सुकता