नाशिक : अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे स्थळ निवड समिती पथक बुधवारी सायंकाळीच नाशिकला दाखल झाले असून, ते गुरुवारी सकाळपासून प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागांची पाहणी करणार आहेत. स्थळ निवड समितीने गुरुवारी भेट दिल्यानंतर शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा मुळातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने ते नियंत्रित स्वरूपात सुमारे चार हजार रसिकांच्या उपस्थितीतच पार पाडायचे नियोजन आहे. त्यात दिल्लीसारख्या शहरात कोरोनाचे प्रमाण अद्यापही प्रचंड असताना तिथे साहित्य संमेलन भरवून रसिकांना अधिक धोक्यात टाकणे योग्य होणार नाही, हादेखील त्यामागील विचार आहे. तसेच दिल्लीतील एका संस्थेने याआधी चार वर्षांपूर्वी एकदा संमेलनाची मागणी करून ऐनवेळी त्याच्या आयोजनास नकार दिल्याने महामंडळ तोंडघशी पडण्याच्या स्थितीत आले होते. मात्र, त्या वर्षी कसेबसे बडोद्यात संमेलन आयोजित करून वेळ मारून नेण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीकरांचे निमंत्रण कितपत गांभीर्याने घ्यायचे, हादेखील महामंडळाला पडलेला प्रश्न आहे. तसेच महामंडळाने दिल्लीच्या नावाचा जर खरोखर विचार केला असता, तर दिल्लीत जाऊनदेखील या स्थळ निवड समितीने जाऊन पाहणी केली असती. मात्र, गुरुवारी (दि. ७) नाशिकला स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल तत्काळ ८ जानेवारीला अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे संमेलन स्थळाची घोषणा करणार आहेत. संमेलन मार्चअखेरपर्यंत घ्यायचे असल्याने स्थळाची निवडदेखील तातडीने जाहीर करणे महामंडळासाठी क्रमप्राप्त झाले आहे.
इन्फो
गोएसो कॅम्पससाठी मोर्चेबांधणी
नाशिकमध्ये साहित्य संमेलन भरविण्यासाठी लोकहितवादी मंडळाला सर्वाधिक सोयीस्कर जागांमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमधील इंजिनीअरिंग कॉलेज परिसरातील जागेसाठी सर्व मोर्चेबांधणी झाली आहे. या जागेत अन्य सर्व व्यवस्था अत्यंत परिपूर्ण होऊ शकणार असली तरी साहित्य संमेलनासाठी लावल्या जाणाऱ्या स्टॉल्ससाठी जागेची उपलब्धता अपेक्षेपेक्षा थोडीशी कमी राहणार आहे. त्यामुळे अपेक्षित ३०० ऐवजी २०० ते २२५ स्टॉल्सचीच उभारणी शक्य होईल. किंवा मग दोन स्टॉल्सच्या जागेमधील अंतर अजून कमी करण्याचा पर्याय निवडण्यावर खल सुरू आहे. त्याशिवाय दुसरी मोक्याची जागा म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या निसर्गरम्य जागेचाही विचार होऊ शकतो. मात्र, ते स्थान शहराबाहेर असल्याने रसिकांकडून तिथे प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन ते स्थान टाळले जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
इन्फो
स्थळ पाहणीस नाही अध्यक्ष
स्थळ निवड समितीमध्ये कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आरोग्याच्या समस्येमुळे स्थळ निवड समितीच्या अन्य सदस्यांसमवेत येऊ शकलेले नाहीत.