नाशिक : कुंभनगरीचा गोदाकाठ व त्याभोवती जाणवणारा बकालपणा आजही कायम आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचवटी, गोदाकाठ व तपोवनाच्या विकासाबाबत अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाही. शहराचा केंद्राच्या ‘रामायण सर्किट’ योजनेत समावेश जरी असला तरी अद्याप त्याअंतर्गत कुठलीही विकासकामांची चिन्हे दिसत नसल्याने धार्मिक पर्यटनाचे रुपडे या योजनेतून पालटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘रामायण सर्किट’च्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी उलटला असून, अद्याप त्यासंबंधी कुठलीही हालचाल शहरातील पंचवटी, तपोवन परिसरात होताना दिसून येत नाही. रामायण सर्किट केंद्राच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाच्या सहा राज्यांमधील प्रभू रामचंद्रांशी संबंधित १५ शहरांमधील रामस्मृती जागविणाऱ्या ठिकाणांचा विकास करण्याचा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. जेथे-जेथे प्रभू रामांच्या वास्तव्याचे अस्तित्व जागविणाºया ओळखुणा आहे, त्या सर्व ठिकाणांचा कायापालट करण्याचा सरकारचा मानस आहे. याअंतर्गत महाराष्टतील नाशिक व नागपूर शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी २०१६ साली योजनेची घोषणा केली; मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक आणि प्रभू रामचंद्रवनवासकाळात प्रभू रामचंद्र पंचवटी, तपोभूमीत वास्तव्यास होते. रामचंद्रांनी मारीच नावाच्या राक्षसाचा गोदाकिनारी वध केला.खर, दुषण, त्रिफिरा या तीन राक्षसांच्या सेनेसोबत प्रभू रामचंद्र व वानरसेनेचे युद्ध झाले. आजचे जुने नाशिक गावठाण भागातील या तीनही राक्षसांचा रामचंद्रांनी वध केला. ती जागा ‘त्रिवध’ नावाने ओळखली जाऊ लागली; मात्र पुढे त्रिवध शब्दाचा अपभ्रंश होऊन तीवंधा नावाने हा परिसर आज ओळखला जातो.गोदावरीच्या रामकुंडात प्रभू रामचंद्र स्नानासाठी येत असे. या कुंडापासून पुढे काही अंतरावर असलेल्या ‘रामगया’ कुंडात त्यांनी आपले वडील दशरथ यांचे श्राध्द केल्याची अख्यायिका सांगितली जाते.पंचवटीतील पाच वडांच्या छायेत असलेल्या एका गुहेत सीतादेवी माता वास्तव्यास होत्या.रामकुंडावरुन भुयारी मार्गातून प्रभू रामचंद्र एका किल्ल्यावर विश्रांती साठी जात असे, रामशेज नावाने ओळखला जातो.तपोवनात लक्ष्मण यांनी शूर्पणखेचे नाक कापल्याची पुराणकथा आहे. नाक हा मराठी शब्द असून, संस्कृतमध्ये नासिका असा शब्द आहे. त्यामुळे नाशिक असे नाव पडले, अशी माहिती इतिहासप्रेमी देवांग जानी यांनी दिली.‘रामायण सर्किट’वर मोठा विश्वास प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी असा पौराणिक वारसा लाभलेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या शहराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली; मात्र या रामायण सर्किटमध्ये तपोभूमीचा समावेश होऊनदेखील आतापर्यंत कुठल्याही प्रकारची विकासकामे येथे सुरू होऊ शकलेली नाही. सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने मंजुरीही दिली आहे. यामाध्यमातून प्रभू रामांच्या आठवणींशी संबंधित पर्यटनस्थळांचा विकास साधला जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार, व्यवसायाच्या संधी व कलागुणांना वाव मिळणार असल्याचा दावाही सरकारने केला आहे.या १५ शहरांचा योजनेत समावेशउत्तर प्रदेशमधील अयोध्या, शृंगवेरपूर, चित्रकूट, सीतामढी, बक्सर, दरभंगा (बिहार) नंदीग्राम (पश्चिम बंगाल) महेंद्रगिरी (उडीसा), जगदलपूर (छत्तीसगढ), भद्राचलम, रामेश्वरम (तामिळनाडू), हंपी (कर्नाटक), नाशिक, नागपूर, चित्रकूट (मध्य प्रदेश) या राज्यांमधील पंधरा शहरांची निवड ‘रामायण सर्किट’ योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.
रामायण सर्किट योजनेतून कुंभनगरीचे रुपडे पालटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:23 AM