वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 06:12 AM2024-08-03T06:12:43+5:302024-08-03T06:12:58+5:30
माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपळगाव बसवंत (नाशिक) : वेशांतर प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या आरोपांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडन करत यामध्ये तसूभरही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला. याबाबत पुरावा मिळाला तर राजकारणातून निवृत्त होईन, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी वेशांतर प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
आपण नाव आणि वेश बदलून प्रवास केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत. मी कधीही वेश बदलून प्रवास केला नाही. विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी त्याची माहिती घ्यावी. गेल्या ३५ वर्षांत मी राज्याचा आमदार राहिलो, खासदार होतो, अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलो आहे. मला माझी जबाबदारी कळते.
सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय. म्हणणाऱ्यांना लाज-लज्जा वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.