नाशिक : महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्रशिक्षणानंतर बदली होवून अडीच महिन्याचा कालावधी उलटूनही महापालिकेचा अतिरीक्त कारभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा खो-खो सुरूच असून, अजूनही पुर्णवेळ आयुक्त महापालिकेला मिळालेला नाही.
विशेष म्हणजे महापालिकेला कायमस्वरूपी पुर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी राज्यकर्त्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली असून, सद्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतांना तरी आयुक्त मिळेल काय असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिकेला पुर्ण वेळ आयुक्त नसल्याने अनेक महत्वाच्या कामांना खीळ बसली असून, अधिकाऱ्यांवरही प्रशासनाचा वचक न राहिल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची खंत मनपाचे काही अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. गेल्या अडीच महिन्यात एकच महासभा होवू शकल्याने त्यानंतर अनेक महत्वाचे प्रस्ताव विविध विभागांनी सादर केले आहेत. परंतु आयुक्तपदाचा अतिरीक्त पदभार असल्यामुळे अधिकारी देखील महत्वाचे निर्णय घेण्यास धजावत नसल्याचे समोर आले आहे