नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्येमनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत नाहीत, अशी काही वर्षांपासूनची अवस्था असून, तीच व्यथा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही संघटनेत फार मोठे बदल करण्यास ते पक्षाध्यक्ष राजी होतील काय, असा प्रश्न कायम आहे.
महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होऊ लागले आहेत. पक्षीय स्तरावर बैठका आणि चर्चा सुरू होत असताना गेल्या चार वर्षांत ज्या समस्या किंवा महापालिकेतील कामकाजाचे कटू निर्णय आज वाटत आहेत, त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वच पक्ष अचानक जागरूक झाले आहेत. मनसेत मात्र वेगळीच तटस्थता आहे. त्याच पक्षात मोजक्याच नेत्यांच्या हाती सूत्रे असली तरी त्यांच्यात गटबाजी आहे. आक्रमक, कल्पक आंदोलने करणारा, प्रसंगी खळ्ळखट्याक करणारा पक्ष म्हणून मनसेची असलेली ओळख आता तशी राहिलेली नाही. त्यामुळेच आता पक्ष पुन्हा फाॅर्मात यावा, यासाठी युवा बिग्रेडची धडपड असून, ती गैरही नाही.
मनसेची स्थापना झाल्यानंतर वसंत गिते आणि अतुल चांडक हे पक्षाचे सर्वेसर्वा होते. ढिकले-गिते गटबाजीमुळे गिते यांना पक्षातून पद्धतशीरपणे हटवल्यानंतर पक्षाला त्याचा फटकाही बसला. परंतु, नंतर डॅमेज कंट्रोल झालाच नाही. त्यातच ज्यांच्या भरवशावर पक्ष सेाडला, ते राहुल ढिकलेही सत्तेचा कल बघून भाजपवासी झाले. त्यामुळे दांडगा जनसंपर्क असलेला मास लीडरशिप असलेला नेता पक्षाकडे नाही. आपल्याच कोशात असणारे नेते पक्षवाढीसाठी काहीही करत नाहीत की पक्षात नव्या कोणाला संधी देत नाहीत, अशी तक्रार आहे. त्यामुळे मूळ मनसेत असलेल्या आणि आता बाहेर गेलेल्या तसेच अन्य पक्षातील अनेकांना मनसे हा पर्याय वाटत असला तरी हे नेते आपल्याला जमू देतील काय, अशी चिंताही वाटत असते. त्यामुळे साहजिकच पक्षात येणारेही कचरत आहेत.
मुळात पक्षसंघटना कायम क्रियाशील राहिली पाहिजे. त्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम आखले पाहिजेत. बळ असो नसो परंतु काही प्रमाणात निवडणुकाही लढल्याच पाहिजेत. परंतु असे काही हेाताना दिसत नाही. पक्षाच्या ठराविक नेत्यांची परवानगी असेल तरच आंदोलने किंवा त्यांनी सेन्सॉर केल्याप्रमाणेच आंदोलने अशी अवस्था आहे. अशावेळी पक्षाला नवीन उभारी कशी मिळणार, हा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी युवा पदाधिकाऱ्यांना व्यक्त होऊ दिले हे चांगलेच झाले. परंतु प्रदेश पातळीवरून देखील स्थानिक पातळीवर संपर्क यंत्रणा हवी, नवीन कार्यक्रम दिले जावेत; अन्यथा पक्षाचे साचलेपण दूर होणे अशक्य आहे. त्यामुळे जानेवारीत येणारे राज ठाकरे संघटनात्मक बदल, संपर्कासाठी यंत्रणा आणि संघटनेतील कार्यक्रमांचे सातत्य यासाठी काय करतील, हे बघणे महत्त्वाचे आहे.