मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षाच्या हितासाठी काम करत नसून त्यांना मुख्यमंत्री पद हवे आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना या संदर्भात शब्द दिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पद रिक्त झालं की ते या पदावर आरुढ होतील. त्यासाठीच, त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणेंनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. तसेच, राज्यात कायदा व सुव्यवस्था उरली नसल्याचे सांगत, राज्यातील यंत्रणांपेक्षा आमच्याकडे केंद्रातील यंत्रणा असल्याचं ते म्हणाले. तसेच, राष्ट्रपती राजवटीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं.
भाजपकडे केंद्रीय यंत्रणा असतील तर आमच्याकडे राज्यातील यंत्रणा आहेत, या प्रश्नावर मोठं कोण? असा प्रतिप्रश्न राणेंनी केला. तसेच, सीबीआय कोणाकडे आहे, ईडी कोणाकडे आहे, खरी चौकशी कोण करू शकतं. अरे, तुमचे 56 आहेत, एवढ्याशा डबक्यात आहेत. आमचा समुद्र आहे, असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर आणि शिवसेनेकडून राज्यातील यंत्रणांचा होणाऱ्या वापरावर थेट प्रहार केला. तसेच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? या प्रश्नावरही त्यांनी बेधडक उत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवारांनी जर हे भाकीत केलं असेल तर त्यांना त्याचा अभ्यास आहे. ते असे भविष्य सांगतात आणि ते खरेही ठरतात, ते खरे ठरावे एवढीच अपेक्षा, असे उत्तर नारायण राणेंनी दिले.
राणेंचं तोंड कोणीही बंद करू शकत नाही
राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्था नाही, लोकं त्रस्त आहेत. मुलींवर अत्याचार करुन त्यांची आत्महत्या दाखवली जाते, सुशांतच्या केसमध्येही हत्या झाली असताना आत्महत्याच. पूजा चव्हाण केसमध्येही काय झालं?. मग, सारवासारवी करण्यासाठी दबाव आणायचा, पण राणेंचं तोंड कोणीही बंद करू शकत नाही, असेही राणेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री घरी, महाराष्ट्र आजारी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे युक्रेन येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री मंत्रालयात आणि कॅबिनेटच्या बैठकीत जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिशा सालीयन हिला न्याय देण्यासाठी आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे. मात्र, ते जर पोलिसांत तक्रार करत असतील तर या मागे कोण आहे हे सांगायला नको असेही राणेंनी म्हटले.