- संजय पाठकनाशिक- लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना देखील नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र मूळ नाशिककर असलेल्या एक अभियंता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी सॅन फ्रान्सिस्को येथून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत, आज त्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आणि कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली.निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग मतदारांना अनेक सुविधा देते इतकेच नव्हे तर त्या दिवशी सुट्टी देखील दिली जाते, परंतु तरीही मतदान न करणाऱ्यांना नाशिककर तुषार दिनकर वाखारकर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. तुषार वाखारकर सॅन फ्रान्सिस्को येथे ऍपल या प्रसिद्ध कंपनीत सध्या अभियंता आहेत. त्यांनी 1995 मध्ये नाशिक मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं होतं. त्यानंतर ते बंगळूरु येथे शिक्षणासाठी गेले आणि नंतर तेथेच नोकरी करू लागले, त्यानंतर त्यांना विदेशात नोकरीची संधी मिळाली आणि मग ते सॅन फ्रान्सिस्को येथे स्थिरावले.दोन वर्षांपूर्वी त्यांनी ऑपल कंपनीत नोकरी पत्करली आहे. तथापि, भारतात 1995 नंतर आपण मतदान करू शकलो नाही, अशी खंत त्यांच्यात होती, आज भारताची स्थिती खूप बदलली आहे आणि मतदानाविषयी खूप जागृती होत असल्याने मतदानाचे महत्त्व आपल्याला पटले, त्यामुळे खास मतदानासाठी नाशिकला येण्याचे नियोजन केले असे वाखारकर यांनी लोकमतला सांगितलं.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 8:36 AM