डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकरसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो. दोघेही भाजी-भाकरीत समाधान मानतात. सर्व जाती-जमातींचे लोक एकत्र येतात. ‘वर्णाभिमान विसरली सारी, एकमेकां लोटांगणी जाती’ असा हा सोहळा असतो. केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतूनदेखील दिंड्या येतात. अनेक सांप्रदायाचे एकत्रिकरण म्हणजे वारकरी संप्रदाय होय.‘उच्च निच नाही कोणी,कर्म धर्म झाला नारायण’असा भाव वारकऱ्यांच्या ठायी मला दिसतो. वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक. आज देशात जाती-जातीमध्ये भांडणे दिसतात. सांप्रदाय धर्मात तणाव दिसतो. परंतु वारीत सर्व जातींचे लोक असतात. श्रीगोंद्याहून शेख महंमदांची पालखी येते.विष्णुमय जग हाच वारकºयांचा धर्म असून पंढरीची वारी हा उपासना मार्ग आहे, असे म्हणता येईल. संध्याकाळात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्गदेखील सहभागी झालेला दिसतो. चंगळवादाला दूर सारून नवसमाज निर्मितीची आणि राष्ट्रीय एकात्मतेचीशक्ती आणि ऊर्जा वारीतून मिळते, असे मला वाटते.(लेखक, पुणे विद्यापीठातीलसंत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख)
वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:57 AM