नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता दर) तीन टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचे पडसाद नामको बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. वार्षिक सभेत माजी संचालकांनी बॅँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना याच मुद्द्यावरून धारेवर धरले, तर ठराव होऊनही त्याचा इतिवृत्तात समावेश नसल्याने प्रशासकांनी सभासदांकडे दिलगिरी व्यक्त केली. सातपूर येथील नामको बॅँकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या उपस्थितीत नामकोच्या ५८व्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीपासूनच गोेंधळाला सुरुवात झाली. हेमंत धात्रक, प्रफ्फुल्ल संचेती, पंडित कातड यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी नामको बॅँकेची निवडणूक घेण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केला होता. त्याचा इतिवृत्तात समावेश नसल्याबाबत प्रशासकांना धारेवर धरले. तसेच अपात्र संचालकांनी निवडणुकीची मागणी केल्याचे चुकीचे पत्र रिझर्व्ह बॅँकेला पाठविल्याबाबत सभासदांची माफी मागण्याचा आग्रह धरला. प्रसाद सबनीस यांनी आपण थकबाकीदार असल्याचा चुकीचा उल्लेख केल्याबाबत जे. बी. भोरिया यांनी माफी मागण्याची सूचना केली. त्यावर ठरावात समावेश नसल्याबाबत तसेच सबनीस यांनी केलेल्या सूचनेनुसार जे. बी. भोरिया यांनी दिलगिरी व्यक्त केली. गजानन शेलार यांनी बॅँक वाचली पाहिजे, त्यासाठी स्पर्धेच्या युगात अन्य राष्टÑीयीकृत बॅँकांच्या धर्तीवर बॅँकेचे कामकाज सुरू करावे, त्यासाठी कोअर बॅँकिंगची सुविधा करावी, यासाठी तीन ते चार कोटींची तरतूद अहवालात धरावी, अशी सूचना केली. सोहनलाल भंडारी, नरेंद्र पवार यांनी सुरतसह अन्य शाखांना बेकायदेशीर कर्जवाटपाबाबत तसेच अन्य बॅकांच्या तुलनेत नामकोचा व्याजदार जास्त असल्याने नियमित शेकडो कर्जदार अन्य बॅँकांकडे वळत असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण शिरोडे यांनी बॅँकेची निवडणूक व्हावी, यासाठी आपण वित्तमंत्री अरुण जेटली व सहकारमंत्री राधामोहनसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे सांगितले. बॅँकेचा वाढलेला एनपीए आणि संचालक मंडळाची निवडणुकीचा ठराव यावरून सभासदांनी प्रशासक जे. बी. भोरिया यांना धारेवर धरले.
नामको बॅँकेच्या सभेत वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:32 AM