नाशिक : गेल्या काही वर्षांत गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी वाइन उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वाइन उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. द्राक्षाची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये वायनरी उद्योग बहरल्याने या शहराने जगभरात ‘वाइन कॅपिटल’ अशी ख्याती मिळविली आहे. या वाइन उद्योगाच्या वाढत्या विस्तारामुळे वाइन ग्रेप पिकविणाऱ्या उत्पादकांनाही चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असून, गारपीट व बेमोसमी पाऊस अथवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाइन उद्योग नाशिकमधील द्राक्षशेतीला नवसंजीवनी देणारा ठरतो आहे. परंतु, यावर्षी वाइन ग्रेप्सलाही परतीच्या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. बागांमधील छाटणीचा कालावधी मागे-पुढे होण्यासोबतच द्राक्षांचे घड फुलोऱ्यात जिरण्याच्या प्रकारामुळे वाइन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात साधारणत: सन २००० पासून वाइन उद्योग बहरला असून, देशात द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी जागतिक दर्जाच्या द्राक्ष उत्पादनाला सुरुवात केली. देशातील द्र्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ५० टक्के वाटा महाराष्ट्रातून येतो. यातील ७० टक्के उत्पादन केवळ नाशिकमध्ये घेतले जाते. नाशिक परिसरात सुमारे तीन ते साडेतीन हजार एकरवर वाइन ग्रेप्सचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत हार्वेस्टींग होणाऱ्या १५ ते १७ हजार टन द्राक्षांपासून सुमारे सव्वा ते दीड कोटी लिटर वाइनचे उत्पादन घेतले जाण्याचा अंदाज ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजी अहेर यांनी व्यक्त केला आहे.
परतीच्या पावसाने वाईन ग्रेप्सलाही फटका, 10 ते 15 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:06 PM
गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे.
ठळक मुद्देवाईन पंढरी नाशिकला परतीच्या पावसाचा फटका वाईन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता