मनोज मालपाणी नाशिकरोडजेलरोड प्रभाग १८ मध्ये शिवसेना, भाजपामध्ये झालेली बंडाळी, आघाडी व मनसेचे पूर्ण होऊ न शकलेले पॅनल अशाही परिस्थितीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्याने प्रभागाच्या सर्व जागांवर चुरस कायम आहे. प्रभाग ३२ आणि ३५ चा परिसर मिळून प्रभाग १८ तयार झाल्याने जुन्या प्रभागाचे अशोक सातभाई, रंजना बोराडे, पवन पवार, शोभना शिंदे यांचा प्रभावक्षेत्र नव्या प्रभागात आहे. पोटनिवडणुकीत मंदाबाई ढिकले या विजयी झाल्या आहेत, तर दुसरीकडे सलग २५ वर्ष प्रकाश व रंजना बोराडे दाम्पत्य या भागातून विविध पक्षाच्या झेेंड्याखाली प्रतिनिधित्व करीत आहेत. पंचक गावठाण, कॅनॉलरोड झोपडपट्टी व्यतिरिक्त सर्व परिसर सोसायटी, कॉलनीचा आहे. या भागात सर्वच पक्षाचे कमी अधिक प्राबल्य असले तरी येथून जातीपातीचे राजकाराण नेहमीच वरचढ ठरले आहे. पक्षाचे प्राबल्य असले तरी शिवसेना, भाजपाला बंडखोरीचा काही प्रमाणात सामना करावा लागणार आहे, तर आघाडी, मनसेचे पॅनल पूर्ण होऊ शकले नाही.‘अ’ अनुसूचित गटातून सेनेकडून माजी नगरसेविका शोभना संजय शिंदे, भाजपा-शरद मोरे, अपक्ष पवन पवार, आघाडीचे मनोजकुमार रोकडे, सेनेच्या बंडखोर शांताबाई शेजवळ निवडणूक रिंगणात आहेत. भाजपावासी झालेले अपक्ष नगरसेवक पवन पवार यांच्यावरील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे भाजपाने पवार यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. असे असले तरी भाजपाची अंतर्गत भूमिका असल्याचीही चर्चा लपून राहिलेली नाही. मनसेकडून पोटनिवडणूक लढविलेल्या शांताबाई शेजवळ यांचे नाव सेनेत मागे पडले. त्यामुळे शेजवळ यांनीदेखील बंडाचे निशाण फडकवले. मनसेला या गटात उमेदवार नाही, तर आघाडीकडून कॉँग्रेसचे मनोजकुमार रोकडे आपल्या परीने खिंड लढवत आहे. ‘ब’ इतर मागासवर्ग महिला प्रवर्गातून रंजना बोराडे, भाजपा मंदा फड, आघाडी कडून राष्ट्रवादीच्या संगीता तुपे, सुशीला खरोटे, लता ढिकले रिंगणात आहे. आघाडीच्या तुपे यांना स्वत:लाच यंत्रणा उभी करावी लागत आहे. ‘क’ सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या मीराबाई हांडगे, शिवसेना शीतल ताकाटे, मनसे रोहिणी संतोष पिल्ले, भाजपा बंडखोर मंदाबाई ढिकले, गेल्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविलेल्या सुलोचना बोराडे, केतकी बोराडे या निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचा जुना कार्यकर्ता सचिन हांडगे याला स्वत:ची उमेदवारी मिळविण्यासाठी शेवटपर्यंत झगडावे लागले तर मातोश्री मीराबाई यांना उमेदवारी मिळाली. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या मंदाबाई ढिकले यांची उमेदवारी कापल्याने बंडखोरी करावी लागली आहे.
मतविभागणीवर विजयाचे गणित
By admin | Published: February 12, 2017 12:35 AM