इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी (जनमित्र) शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.देवदत्त सोसायटीच्या परिसरातील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. समीर वाघ हे बिघाड दुरुस्तीसाठी खांबावर चढले तेव्हा विजेचा प्रवाह बंद करण्यात आला होता. हेमराज कडेकर हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरुस्ती करत असलेले समीर वाघ यांना विजेचा धक्का बसला व ते जिवाच्या आक ांताने ओरडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हेमराज कडेकर यांनी तत्काळ भ्रमणध्वनीवरून, ‘वीजप्रवाह का सुरू केला ? तातडीने बंद करा, काम सुरू असून ‘जनमित्र’ला शॉक लागला आहे, असे कळविले’ त्यावेळी तातडीने पुन्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि हेमराज यांनी शिडीवरून खांब गाठला. यावेळी त्यांनी खांबावर बसून जिवाची पर्वा न करता समीर वाघ यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला. पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत श्वासोच्छवास देण्यात आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलीस ठाणे, अग्निशमन मुख्यालयास नागरिकांकडून कळविण्यात आली. क्षणार्धात पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मोठ्या शिडीच्या साहाय्याने हेमराज व जवानांनी अत्यवस्थेत असलेल्या वाघ यांना खाली उरविले. गजानन प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
‘शॉक’ लागून ‘जनमित्र’ गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:10 PM