सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त्याचे यश अवलंबून असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या बाबतीत तेच अनुभवास येत आहे ही बाप्पांचीच कृपा म्हणावी.बाप्पांचा उत्सव पर्यावरणपूरक ठरावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला बºयाचअंशी यशही लाभत असून, ‘पीओपी’च्या मूर्तीऐवजी शाडूमातीच्या मूर्तीची मागणी वाढलेली दिसून आली. जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ही बाब खूपच महत्त्वाची ठरते आहे. विशेषत: शाळा-शाळांमधून याबाबत प्रबोधन केले गेले व शाडूमातीच्या मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या. त्यामुळे मुलांनीच निर्णय घेऊन आपापल्या घरात शाडूमातीच्या मूर्तींची स्थापना करण्यात पुढाकार घेतल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, यावर्षी तर त्याही पुढचे पाऊल टाकत मातीऐवजी कापूस, कागदापासून बनविलेल्या ‘इको-फ्रेण्डली’ गणेशमूर्ती साकारल्या गेल्याचेही बघावयास मिळाले. पूर्वी मखर वा सजावटीत मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होताना दिसे, यंदा त्यातही लगाम बसलेला दिसत आहे. दुसरे म्हणजे, स्वच्छ व सुंदर गाव अथवा तंटामुक्त गाव योजनेप्रमाणेच ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून, त्यासही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे एक हजारपेक्षा अधिक गावांमध्ये ‘एक गणपती’ स्थापन करण्यात आले आहेत, हे मोठेच यश असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यासाठी केलेली जनजागृती कामी आली आहे.
प्रबोधनाचे यश !
By किरण अग्रवाल | Published: September 16, 2018 1:54 AM