नाशिक : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस सर्वत्र वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जात असतानाच नाशिक शहरातही रविवारी (दि.१९) विविध ठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सुवासिनींकडून आपल्या पतीला उत्तम आरोग्य तसेच दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाचे पूजन केले.रविवारी शहरातील विविध वटवृक्षांखाली तसेच मंदिरांमध्ये, तर कुठे वडाच्या झाडाची फांदी घरी आणून सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेची विधीवत पूजा केली. यावर्षी दोन दिवस पौर्णिमेचा योग असल्याने अनेक सुवासिनींमध्ये वटपौर्णिमा साजरी करण्याबाबत संभ्रमावस्था पहायला मिळाली. दाते पंचागामध्ये दिलेल्या खुलाशानुसार सर्वत्र रविवारी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी सुवासिनींनी सौभाग्याच प्रतीक हळद-कुंकू आणि सौभाग्यवतीचे फणी, करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तसेच पाच फळे वडाच्या झाडाजवळ अर्पण केले तसेच वडाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा मारून आणि सूत गंडाळून मनोभावे वटवृक्षाची पूजा केली. शहरातील पंचवटी, नाशिकरोड, उपनगर, सिडको, अंबड, सातपूर आदि परिसरांत वटपौर्र्णिमेचा उत्साह बघायला मिळाला.
वटपूजनाने पतीच्या दीर्घायुष्याची कामना
By admin | Published: June 19, 2016 11:18 PM