नाशिक : शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली. मुख्यत्वे उत्तर भारतातील असलेल्या आणि सध्या नाशिकस्थित महिलांनी श्रद्धेने आणि उत्साहाने हे व्रत केले. या उपवासाच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी रेखाटली. लाल रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान केले. नवी वस्त्रे आणि सोळाशृंगार हे या व्रताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासाठी महिलांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खरेदी पूर्ण केली होती. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चाळणीतून चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेत, त्यांचे औक्षण केले व नंतर उपवास सोडला. करवा चौथच्या दिवशी पुरी, भाजी, शिरा असा स्वयंपाक केला जातो. भात शिजवला जात नाही. त्याचे पालन करत स्वयंपाक करण्यात आला होता.म्हणून केली जाते ‘करवा चौथ’ची पूजासात भावांची आवडती आणि एकुलती एक बहीण वीरावती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जली उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांना दु:ख होते. जोपर्यंत चंद्रदर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्न ग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणाºया झाडावर गोलाकार आरसा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरावतीदेखील आपला उपवास सोडते. पण खºया चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु:खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रगट होते. रडणाºया वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी कहाणी सांगते. वीरावती आणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीचा पती पुन्हा जिवंत होतो. अशी ही दंतकथा या व्रतामागे आहे. इतरही अनेक कथा प्रचलित आहेत.
करवा चौथद्वारे महिलांनी केली पतीच्या दीर्घायुष्याची कामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:37 AM