नाशिक : उत्सवाची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धार्मिक, सामाजिक संघटना यांसह युवकांचे ग्रुप स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्र मांची मेजवानी मिळणार आहे. नाशिक शहरासह उपनगरीय परिसरातील नाशिकरोड, सिडको, सातपूर, आडगाव परिसरातील उत्कृष्ट सुविधा देणाऱ्या कृषिपर्यटन केंद्र आणि हॉटेल्सला तरुणाईची पसंती मिळत असून, अनेकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तर काहींनी नववर्षाच्या पहाटे जल्लोषाची तयारी केली असून, काही तरुणांनी रात्रभर जागरण करून नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.नाशिकमधील वेगवेगळ्या वाइनरी आणि कृषिपर्यटन केंद्रांसह नामांकित हॉटेल्समध्ये नववर्षाच्या मेजवान्या रंगत असल्या तरी, येथील तरु णाईला शहराबाहेर पडून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे अनेकांनी कोकण, गोव्यासह केरळच्या सहलींचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर समाजभान जपणाºया अनेक ग्रुपनी गड-कोटांची स्वच्छता मोहीम व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तर काहींनी नववर्षात नवीन संकल्प करण्यासाठी नवनवीन योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील करण्यात येत आहे.विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून, तरुणाईच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरची रात्र उत्साहात जावी म्हणून रंगारंग कार्यक्र म आयोजित केले आहेत. या कार्यक्र मांसाठी मुंबईहून कलाकार येणार आहेत. पाचशे रु पयांपासून तर पाच हजार रु पयांपर्यंत तिकीट आहे. याठिकाणी नृत्याचीही सोय असणार आहे. फक्त हॉटेल्सच नव्हे तर काही खासगी ठिकाणीही रंगारंग कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत. नवीन वर्षांनिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. मॉल्समध्ये ग्राहकांसाठी विशेष आॅफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्येच नव्हे तर विविध निवासी संकुलातही जल्लोषाची तयारी सुरू आहे. तसेच डीजेवर नृत्य करीत धमाल करण्यासाठी काही अपार्टमेंटही सज्ज झाले आहेत.पोलीस प्रशासनही असणार सज्जया आनंदोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. मद्यतस्करी रोखण्याबरोबर बारवर त्यांची करडी नजर असणार आहे. यासाठी ब्रेथ अॅनालायझनरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. निर्भया पथकही थर्टिफर्स्टच्या पार्श्वभूमीवर तैनात ठेवण्यात येणार आहे. तर यावेळी मद्य पिऊन वाहने चालविण्याऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांकडून गंगापूररोड, कॉलेजरोड, आडगाव परिसर, नाशिकरोड, सिडको परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मोठ्या हॉटेल्सवरही पोलिसांची नजर असणार असून, महिला सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाला सुरुवात‘लेट इट गो’ म्हणत गतवर्षाला निरोप देत, नववर्षाच्या शुभेच्छा देणारे फोटो, व्हिडीओ किंवा आॅडिओ क्लिपच्या माध्यमातून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश सातत्याने पाठवण्यास सुरुवात झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावरही गतवर्षीचा आढावा आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी आपले ‘स्टेटस’ही हॅपी न्यू इयर किंवा नववर्षाच्या शुभेच्छा असे ठेवत असल्याचे दिसत आहे. तर काहीजण ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणत जुन्या-वाईट आठवणी मागे ठेवत आनंदाने, उत्साहाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या जमान्यात एसएमएसचे माध्यम फार मागे पडले आहे.