नाशिक : संपुर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे शहरावर पाणी टंचाई व कपातीचे घोेंगावत असलेले संकट सततच्या दोन दिवसांच्या पावसामुळे काहीसे दूर होण्यास मदत झाली आहे. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जुलै महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा पाणी पुरवठा विभागाने तयार केला होता. मात्र हा प्रस्ताव आता गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.
पावसाच्या आगमनाने गंगापूर धरणात २९ टक्के जलसाठा झाल्याने महापालिकेला हायसे वाटले आहे. हवामान खात्याने यंदा अलनिनोचा धोका व्यक्त करून पावसाळा लांबणीवर पडण्याचा तसेच कडक उष्णतेमुळे पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने धरणातील पाण्याची उपलब्धता व शहराला लागणारे एकूण पाण्याचा ताळामेळ बसवितांनाच मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यास मंजुरी मिळू शकली नव्हती.
तथापि, हवामान खात्याने बिपोरजॉय या नवीन वादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज व्यक्त केला. प्रत्यक्षात या वादळामुळे मान्सून लांबणीवर पडला. जून महिना कोरडाच गेला. दुसरीकडे धरणाची पातळी खाली जात असल्याचे पाहून पुन्हा एकदा पाणी कपातीची तयारी पाणी पुरवठा विभागाने केली होती. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करून धरणाचे पाणी ऑगस्ट अखेर पर्यंत वापरण्याचे ठरविण्यात आले होते. जुलै महिन्यापासून पाणी कपात सुरू करण्याचे वाटत असतांना जून महिन्याच्या अखेरच्या दिवसांत मान्सूनचे आगमन झाले. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांबरोबरच महापालिकेलाही दिलासा मिळालाय.