महेश गुजराथी
चांदवड (नाशिक) : कांद्यावरील निर्यात शुल्क आदेश तत्काळ मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले. ही मागणी येत्या गुरुवार, दि. २४ ऑगस्टपर्यंत मार्गी न लागल्यास मुंबई - आग्रा महामार्गावर मोठे जनआंदोलन करण्यात येईल. त्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, गणेश निंबाळकर, विलास भवर, शिवाजी कासव, राहुल दादा कोतवाल, भरत मुरलीधर ठाकरे, विजय जाधव, संपतराव वक्टे, नवनाथ भवर, दशरथ गांगुर्डे, योगेश न्याहारकर, बबन ठोंबरे, दत्तात्रय वाघचौरे, प्रकाश शेळके, अनिल शहाजी पाटील, केशव ठाकरे, ज्ञानेश्वर आवारे, साहेबराव चव्हाण, उत्तमराव ठोंबरे, कमरूद्दीन इनामदार व कांदा व्यापारी असोसिएशनचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात व चांदवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मागील दोन वर्षांपासून कांद्यास उत्पादन आधारित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे. त्याचप्रमाणे अस्मानी संकटांना सामोरे जात शेतकरी मोठ्या जिद्दीने पिकांचे उत्पादन घेत असतो. मात्र, केंद्र शासनाकडून जाणुनबुजून शेतमालाचे बाजारभाव कमी करण्याकरिता हस्तक्षेप होत असल्याने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम केंद्र शासनाकडून केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.