नाशिक : शनिवारच्या मध्यरात्रीनंतर मालेगावात ५ पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त नागरिकांपर्यंत पोहोचले असतानाच रविवारी दुपारी मालेगावातूनच अजून १३ कोरोनाबाधित आढळल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या बारा तासांत मालेगावमधून एकूण १८ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने मालेगावबाबत जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणेलाही मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे मालेगावातून गत पाच दिवसांत मिळून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २७ वर पोहोचली असून, त्याशिवाय मालेगावचा एक रुग्ण यापूर्वीच दगावला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वणवा पेटण्यात मालेगावमधून सातत्याने सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे असलेले मोठे प्रमाण कारणीभूत ठरत आहे. रविवार सायंकाळपर्यंत मालेगावातील २७ रुग्ण पॉझिटिव्ह, तर नाशिक महानगरातील तीन आणि चांदवडचा एक रुग्ण याप्रमाणे सध्या एकूण ३१ कोरोनाबाधितांवर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. निफाड तालुक्यातील पिंपळगावनजीक येथील पहिला कोरोनाबाधित शनिवारीच कोरोनाच्या आजारातून बरा होऊन कोरोनामुक्त झाला, तर त्यापूर्वीच मालेगावच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असून, अन्य सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालय, नाशिकमधील मनपाचे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय, मालेगावचे उपजिल्हा रुग्णालय येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मालेगावमध्ये शनिवारी मध्यरात्री आढळलेले ५ आणि रविवारी आढळलेले १३ हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित कुटुंबांतील सदस्य किंवा त्यांच्या अत्यंत निकटच्या नात्यातील, संपर्कातील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येणे जवळपास निश्चित होते, हे आरोग्य यंत्रणा जाणून होती. त्यामुळे त्या सर्व व्यक्तींना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच वेगळे करून ठेवून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी किमान आतातरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे अत्यावश्यक असून, तरच कोरोनाची बाधा टाळणे शक्य आहे., असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.