नाशिक महापालिकेची निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली असून, गेल्या काही महिन्यांपासूनच कॉँग्रेसवगळता अन्य पक्षांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी, शाखांची निर्मिती, बैठका, मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना उत्साहित केले जात आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने शहर व जिल्ह्यात कहर माजविलेला असताना त्याचाही लाभ राजकीय पक्षांनी उठविण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जम्बो कोविड सेंटर उभारून कोरोनाबाधितांना मदतीचा हात दिला आहे तर शिवसेनेनेही जागोजागी कोविड सेंटर उभारून बाधितांना ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात आघाडी घेतली आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील यात उडी घेऊन रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी थेट मुंबईत आंदोलन करून रुग्णांप्रती आपली सहवेदना प्रकट केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर मात्र सामसूम दिसू लागली आहे. नाही म्हटले तरी, १४ एप्रिलला नाशिक भेटीवर आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस कार्यालयात कोरोना सहायता कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून कोरोनाबाधित व त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या कक्षाला घरघर लागली आहे. कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले असून, शहर कार्यालयात एक पगारी कर्मचाऱ्याची नेमणूक करून फक्त नोंदी ठेवण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे पक्षाचा भगूरचा नगरसेवक कोरोनाने बाधित होऊन सर्वत्र मदतीची याचना करत असताना वेळेवर मदत न मिळू शकल्याने त्यांना अखेर मृत्यूने गाठले आहे. नाही म्हटले तरी, मध्यंतरी युवक कॉँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेऊन आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यानंतर मात्र संपूर्ण जिल्हा कोरोनाने त्राही त्राही करत असताना कॉँग्रेसचे स्थानिक नेतृत्व मात्र कोरोनाच्या भीतीने गायब झाल्याची चर्चा पक्षाचेच कार्यकर्ते करत असून, शुक्रवारी नाशिक भेटीवर येत असलेल्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यावर नेतृत्वाने समाधान मानले आहे.
चौकट====
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीने आश्चर्य
पहिल्यांदाच नाशिक भेटीवर येत असलेल्या यशोमती ठाकूर यांनी तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आखला आहे. कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या भेटीचा राजकीय फायदा उचलणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांना आपल्या निवासस्थानाचे निमंत्रण देऊन कॉँग्रेसवर आघाडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(फोटो ०५ काँग्रेस)