नाशिक : शहर व परिसरात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याच्या घटना घडत असल्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (दि.३) भर दुपारी अवघ्या दीड तासात गंगापूररोड, आडगाव, डीजीपीनगर या तीन भागांमध्ये लागोपाठ घडलेल्या घटनांमध्ये एकूण साडेसात तोळे सोने चोरट्यांनी हातोहात हिसकावून पोबारा करत पोलिसांना आव्हान दिले आहे.नाशिककरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला होता. केवळ वीस मिनिटांत ओरबाडून नेलेल्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा गुरुवारी दीड तासात घडलेल्या तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पोलिसांची नाकाबंदी आणि त्याचा दर्जा चव्हाट्यावर आणून ठेवला आहे. त्याचप्रमाणे पोलीस गस्तीविषयीदेखील सर्वसामान्यांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे. गंगापूररोडवरील एका ६६ वर्षीय मीना सुभाष साखला घरकाम करणाºया महिलेसोबत व्हीलचेअरवरून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कॉलनीमध्ये फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोनसाखळी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसरी घटना कोणार्कनगर परिसरात घडली. सुनंदा बडगुजर (५५) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येत अशाच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे बडगुजर या एकट्या रस्त्याने जात नव्हत्या तर त्यांच्यासोबत तीन ते चार महिला होत्या तरीदेखील चोरट्यांनी धाडस केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तिसरी घटना डीजीपीनगर क्रमांक १ परिसरात मंदिराजवळ घडली. उषा सत्पालसिंग चव्हाण (५१) दूध घेण्यासाठी पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली.
दीड तासात तीन मंगळसूत्र खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:40 AM