नाशिक : वडाळागाव परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भुखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढीगाला बुधवारी (दि.२१) संध्याकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजात धस्स झाले.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एका जागरूक नागरिकाने ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात दुरध्वनीवर संपर्क साधून वडाळागावाच्या दिशेने आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर दिसत असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रतिनिधीने संबंधित गावात याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता साठेनगर भागात कचरा व गवताला आग असल्याची खात्री पटली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या मुख्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. सिडको उपकेंद्राचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचून लागलेली आग विझविल्याने अनर्थ टळला. मोकळ्या भुखंडावर आग लागल्यामुळे वा-याने आग रौद्रावतार धारण करण्याची शक्यता होती. जवळच साठेनगर ही गोरगरीब कष्टक-यांची वसाहत असल्यामुळे धोका वाढला होता; मात्र तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला व रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आग कोणी लावली याबाबत माहिती मिळू शकली नाही. उघड्यावर शौचासाठी जाणाºया काही लोकांनी धुम्रपान करताना दाखविलेल्या निष्काळजीमुळे कच-याने पेट घेतला असावा अन्यथा भंगार गुदामांमधील कामगारांनी कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा या भागात सुरू होती.