सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे महिलेचा शेततळ्यालगतच्या खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि. २२) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. सविता मच्छिंद्र सैन्द्रे (२१) रा. पंचाळे, ता. सिन्नर असे दुर्देवी मृत महिलेचे नाव आहे. सविता सैन्द्रे या रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंचाळे-उजनी रस्त्यालगत असणाऱ्या ठाकूर यांच्या शेततळ्यालगत खोदलेल्या खड्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बैलाने सविता यांना धक्का दिल्याने त्या १५ फूट खोल पाणी असलेल्या खड्यात पडल्या. त्यांच्यासोबत तीन छोटे मुलेही आले होते. त्यांनी सविता यांना पाण्यात पडताना पाहिल्यानतंर शेजारीच बाजरीची सोंगणी करणाºया शेतकऱ्यांकडे धाव घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. काही अंतरावर मेंढ्या चारत असलेले सविताचे पती मच्छिंद्र व दीर गोरख सैन्द्रे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सोमनाथ बाबुराव सैन्द्रे यांनी खड्यात उडी मारून सविताला पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. पोलीस मित्र रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी. डी. बलक, गौरव सानप, सुनील ढाकणे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मयत सविताचे हिवरगाव येथील माहेर असून दोन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. याप्रकरणी मुसळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंचाळे येथे शेततळ्यालगत खड्डयात पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:26 PM