नांदगाव : रमाई नगरातील प्रसूतीसाठी अडलेल्या महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने तिने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
ग्रीन कॉरिडॉर बनवून गंभीर रुग्णाला तातडीने मदत पाठविण्यासाठी शहरातील विविध यंत्रणा काम करतात. या पार्श्वभूमीवर नांदगाव सारख्या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयीन टीमने वेळोवेळी अनेकांचे जीव वाचविले आहेत. त्यांच्या मिनी ग्रीन कॉरिडॉरची अनेक उदाहरणे आहेत.
असाच एक प्रकार येथील रमाई नगरमध्ये घडला. एका गरीब महिलेची प्रसूती अडली होती. मध्यरात्र उलटून गेलेली, अपूर्ण पैसे व डॉक्टरांनी दाखवलेली हतबलता यामुळे कुटुंबातील सर्वच चिंतेत होते. प्रसंग बाका होता. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही तर आई व बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आम्रपाली कटारे कांदे यांच्या कार्यालयात काम करतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नगरसेवक किरण देवरे व सागर हिरे यांना कळविले. पुढच्या काही मिनिटात रुग्णवाहिका येऊन महिलेला मनमाडच्या करुणा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी प्रसूती नॉर्मल झाली. रुग्णालयात महिलेने पहाटे एका सुंदर बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ सुखरूप असल्याचा निरोप आम्रपाली यांनी देवरे व हिरे यांना कळविला.
--------------------
मी आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयात काम करते. मला आमदारांचे कार्य आणि आपत्ती प्रसंगात मदतीला धावणारी त्यांची यंत्रणा माहिती असल्याने रात्री किरण देवरे व सागर हिरे यांना फोन लावला. त्यांनी पुढची मदत तातडीने केली.
- आम्रपाली कटारे