नाशिक : कौटुंबिक वादामुळे गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेस सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी नदीत उडी घेऊन वाचविल्याची घटना सोमवारी (दि़१६) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळील पुलावर घडली़ या महिलेचा जीव वाचविणारे पोलीस नाईक आऱ पी़ कडाळे व पोलीस शिपाई आऱ सी़ कहांडळ या दोघांचाही पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़कॅनडा कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने आत्महत्त्येचा निर्णय घेतला़ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संबंधित महिला गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्सजवळील पुलाच्या दिशेने पळत जात असल्याचे बीट मार्शल कडाळे व कहांडळ यांच्या लक्षात आले. त्यांनी या महिलेचा पाठलाग करून तिला अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र महिलेने क्षणार्धात गोदापात्रात उडी मारली. क्षणाचाही विलंब न करता कडाळे व कहांडळ या दोघांनीही गोदापात्रात उडी घेऊन महिलेस पाण्याबाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर काही वेळातच तिचा पतीदेखील त्याठिकाणी आला.त्याने आमचे भांडण झाल्याने पत्नीने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली़ या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेस समुपदेशनासाठी निर्भया पथकाच्या हवाली केले़ पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी पोलीस कर्मचारी कडाळे आणि कहांडळे या दोघांचाही सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले़
नदीत उडी मारलेल्या महिलेला वाचविले
By admin | Published: January 18, 2017 12:17 AM