हिरावाडी-अमृतधाम लिंकरोडकडे जाणाऱ्या वरदविनायक मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी सुमन अशोक गुंजाळ (५५,रा.गोपाळनगर) यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्या वरदविनायक मंदिर परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळेस एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे. पालेभाज्या, फळभाज्या खरेदी करताना गृहिणींकडून अधिक बारकाईने तपासून खरेदी करण्यावर भर दिला जातो. यामुळे गृहिणींचे संपूर्ण लक्ष समोरील पालेभाज्या, फळभाज्या निवडण्यावर असते. त्याचाच फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवित असल्याचा प्रकार पुन्हा घडू लागला आहे. सोमवारी सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानंतर गुंजाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी परिसरातील गस्ती पथकांना बिनतारी संदेशावरून घटनेची माहिती देत दुचाकी चोर व दुचाकीचे वर्णन कळविले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजीबाजारातून महिलेची सोनसाखळी खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:18 AM